Sawantwadi News : सावंतवाडीचे वैभव ‘मोती तलाव’ सांगतोय आपली कहाणी!

शेअर करा

ऐतिहासिक वारसा, जैवविविधता आणि बगळ्यांचे माहेरघर; तलावाचे निसर्गसौंदर्य आजही आकर्षणाचे केंद्र!

सावंतवाडी,दि.२९ ऑक्टोंबर ( अभिमन्यू लोंढे)


मी मोती तलाव बोलतोय…
​सावंतवाडी शहराचं नाव घेतलं की डोळ्यांसमोर उभे राहतात ते येथील ऐतिहासिक राजवाडा, हिरवीगार वनराई आणि या सर्वांच्या मुकुटात मण्याप्रमाणे चमकणारा मी… म्हणजेच सावंतवाडी शहराचं वैभव असलेला ‘मोती तलाव’!
​माझी निर्मिती झाली तेव्हा माझा विस्तार खूप मोठा होता. माझ्या या विस्तीर्ण आणि निर्मळ पाण्यात एकेकाळी सावंतवाडीकर मोठ्या आनंदाने पोहायला यायचे, जलविहार करायचे. माझ्या काठावर बसून अनेक पिढ्यांनी निसर्गाचा आनंद घेतला आहे, प्रेमाचे गुणगान गायले आहेत आणि माझ्याशी संवाद साधला आहे. सावंतवाडी शहराच्या सौंदर्यात आणि वैभवात खऱ्या अर्थाने भर घालण्याचे काम मी वर्षानुवर्षे करत आलो आहे. केवळ सौंदर्यच नव्हे, तर माझ्या या समृद्ध परिसरामध्ये मी जैवविविधता आणि वन्यजीवांचे अहोरात्र संरक्षण करत आहे. माझ्या सानिध्यात वावरणारे रंगीबेरंगी पक्षी, विविध जलचर प्राणी या सर्वांची काळजी मी एका पालकाप्रमाणे घेत असतो.
​माझ्या काठावर असणाऱ्या उंचच उंच झाडांवर आणि परिसरामध्ये बगळ्यांचे साम्राज्य पाहायला मिळते. हे बगळे सकाळी सूर्य उगवताच आपल्या अन्नाच्या शोधात बाहेर उड्डाण करतात आणि दिवसभर विविध ठिकाणी विसावा घेऊन, संध्याकाळ होताच पुन्हा माझ्या सानिध्यात परततात. माझ्या काठावर असलेल्या झाडांवर त्यांचा हसरा आणि हवाहवासा किलबिलाट माझ्या संध्याकाळच्या सौंदर्यात अजूनच भर घालायचा.
​परंतु, गेल्या काही वर्षांपासून माझ्या या वैभवाला आणि अस्तित्वाला घरघर लागली आहे, याचे मला अतोनात दुःख वाटते. माझ्या पात्रात मोठ्या प्रमाणावर जलपर्णी वाढली आहे. मानवी हलगर्जीपणामुळे काही ठिकाणचे खराब आणि दूषित सांडपाणी थेट माझ्या पाण्यात सोडले जात आहे, ज्यामुळे माझे पाणी अत्यंत अशुद्ध आणि प्रदूषित झाले आहे. एकेकाळी स्वच्छ असणारे माझेपाणी आता हिरवेगार आणि दुर्गंधीयुक्त बनले आहे.
​या वाढलेल्या प्रदूषणामुळे माझ्या कुशीत खेळणारे निष्पाप जलचर प्राणी आणि पक्षी यांची अक्षरशः घुसमट होत आहे. ज्या पाण्यावर माझा आणि माझ्या वन्यजीवांचा लळा लागला होता, तेच पाणी आज त्यांच्यासाठी मृत्यूचा सापळा बनत चालले आहे. श्वास घेणे कठीण झाल्यामुळे अनेक जलचर संकटात सापडले आहेत.
​माझा हा आक्रोश आता सहन होत नाहीये. सावंतवाडी शहराचे वैभव टिकवून ठेवण्यासाठी आणि माझ्यावर अवलंबून असलेल्या या मुक्या प्राण्यांचे प्राण वाचवण्यासाठी नगरपरिषदेने आणि स्थानिक प्रशासनाने तातडीने पावले उचलली पाहिजेत. माझ्या पात्रातील जलपर्णी तातडीने काढून टाकली जावी, सांडपाणी माझ्यामध्ये येण्यापासून रोखले जावे आणि माझे सौंदर्य पुन्हा पूर्ववत करण्यासाठी विशेष मोहीम राबवली जावी, हीच आज माझीर्तार्त विनंती आहे.
​सावंतवाडीचे सौंदर्य वाचवायचे असेल, तर माझा हा टाहो प्रशासनाने ऐकण्याची नितांत गरज आहे!

शेअर करा