सावंतवाडी,दि.०५ जुन
सावंतवाडी तालुक्यातील कनेडी-कुपवाडे-शिवापूर-शिरशिंगे-सांगेली-दाणोली-बांदा या राज्यमार्ग क्र. १९० च्या दुरुस्ती, रुंदीकरण आणि सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना कराव्यात, अन्यथा आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम विभागाने या मागण्यांची दखल घेत सकारात्मक पावले उचलली आहेत. कार्यकारी अभियंता पूजा रा. इंगवले-देसाई यांनी यासंदर्भात लेखी पत्र देऊन कामांचे नियोजन जाहीर केले आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाने दिलेल्या माहितीनुसार, या राज्यमार्गावर रुंदीकरण आणि सुधारणेचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. सरमळे येथील सप्तनाथ मंदिर परिसरात रस्त्याचे रुंदीकरण पूर्ण झाले असून, नदीकाठच्या बाजूला रस्त्याच्या सुरक्षेसाठी आवश्यक असणारे रेलिंग व गॅबियन वॉलचे काम पुढील १५ ते २० दिवसांत पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच सरमळे पूल ते विलवडे या मार्गाची सविस्तर पाहणी करून आवश्यक ती पुढील कारवाई केली जाईल, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
प्रशासनाने मागण्यांची दखल घेऊन नियोजित वेळेत कामे पूर्ण करण्याचे आश्वासन दिल्याने, प्रस्तावित आंदोलन तात्पुरते स्थगित ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.यावेळी सावंतवाडी तालुका काँग्रेस अध्यक्ष अभय मालवणकर, रवींद्र म्हापसेकर, उपसरपंच संतोष कासकर, सगुण गावकर, संतोष तावडे, संदीप सुकी, विनायक सावंत यांच्यासह स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.