​सावंतवाडी : सावंतवाडी नगरपरिषदेला कायमस्वरूपी मुख्याधिकारी द्या – निलम नाईक

शेअर करा

नगरपरिषदेचा कारभार व प्रशासन गतिमान करण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी

​सावंतवाडी,दि.९ जून
सावंतवाडी नगरपरिषदेचा कारभार आणि प्रशासन गतिमान करण्यासाठी येथे तातडीने कायमस्वरूपी व कार्यक्षम मुख्याधिकारी यांची नेमणूक करण्यात यावी, अशी मागणी नगरसेविका सौ. निलम परिमल नाईक यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.


​याबाबत सौ. नाईक यांनी निवेदनात म्हटले आहे की, सावंतवाडी नगरपरिषद ही संस्थानकालीन असून तिची निर्मिती सन १८७७ मध्ये झाली आहे. सुमारे १४९ वर्षांचा प्रदीर्घ इतिहास असलेली ही नगरपरिषद सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वात जुनी व नावलौकिक प्राप्त असलेली नगरपरिषद म्हणून ओळखली जाते. सन २०२६-२७ या वर्षासाठी नगरपरिषदेचे बजेट सुमारे १४९ कोटी रुपये अंदाजित असून, २०११ च्या जनगणनेनुसार २३ हजार असलेली शहराची लोकसंख्या आजमितीस सुमारे ३५ हजार च्या घरात पोहोचली आहे.


​मुख्याधिकारी हे नगरपरिषद प्रशासनाचा कणा मानले जातात. मात्र, सध्या कार्यरत असलेल्या मुख्याधिकाऱ्यांकडे तात्पुरता पदभार असून, त्यांच्याकडे अन्य ठिकाणचाही अतिरिक्त कार्यभार आहे. परिणामी, सावंतवाडीसारख्या ऐतिहासिक आणि मोठ्या नगरपरिषदेला ते पूर्ण वेळ देऊ शकत नाहीत.


​शहरातील सर्वसामान्य नागरिकांना मूलभूत व नागरी सुविधा वेळेत उपलब्ध करून देणे आणि शहरात सुशासन आणण्यासाठी कायमस्वरूपी मुख्याधिकाऱ्यांची अत्यंत आवश्यकता आहे. त्यामुळे पालकमंत्री नितेश राणे यांनी या विषयात तातडीने लक्ष घालून सावंतवाडीसाठी कायमस्वरूपी मुख्याधिकारी नियुक्त करावा, अशी आग्रही मागणी सौ. निलम नाईक यांनी केली आहे.

शेअर करा