**लाड-पागे समितीच्या शिफारशींच
सावंतवाडी,दि.१४ जून
लाड-पागे समितीच्या शिफारशींच्या अनुषंगाने आणि शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या २४ फेब्रुवारी २०२३ च्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार, सावंतवाडी नगरपरिषदेच्या सफाई कामगारांच्या वारसा हक्काची अत्यंत प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात आली आहे. या ऐतिहासिक निर्णयानुसार सावंतवाडी पालिकेच्या २७ कर्मचाऱ्यांच्या वारसांना आज राज्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली.
या महत्त्वपूर्ण सोहळ्याला पालकमंत्री नितेश राणे यांच्यासह आमदार दीपक केसरकर, नगराध्यक्ष श्रद्धा सावंत-भोसले, उपनगराध्यक्ष अँड अनिल निरवडेकर, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, सभापती आनंद नेवगी, सुधीर आरीवडेकर,सौ दिपाली भालेकर,प्रतिक बांदेकर,आणि अन्य मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.
संपूर्ण महाराष्ट्रात सावंतवाडीचा पहिला मान
लाड-पागे समितीच्या शिफारशींनुसार वारसा हक्काने अशा प्रकारे एकत्रित नियुक्तीपत्रे देण्याची कामगिरी संपूर्ण महाराष्ट्रात प्रथमच सावंतवाडी शहरात झाली आहे. याबद्दल बोलताना पालकमंत्री नितेश राणे यांनी या ऐतिहासिक निर्णयाचे श्रेय राज्य सरकारला देत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष आभार मानले. तसेच, ही प्रक्रिया अत्यंत गतीने आणि पारदर्शकपणे पूर्ण केल्याबद्दल त्यांनी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि पालिका प्रशासनाचे जाहीर कौतुक केले. नियुक्तीपत्र प्राप्त झालेल्या सर्व नवनियुक्त कर्मचाऱ्यांना पालकमंत्र्यांनी त्यांच्या भावी वाटचालीस व सेवेस शुभेच्छा दिल्या.
नियुक्तीपत्र प्राप्त झालेल्या कर्मचाऱ्यांची नावे:
सावंतवाडी नगरपरिषदेत वारसा हक्काने नियुक्ती मिळालेल्या कर्मचाऱ्यांमध्ये अभिजित गुरुनाथ तावडे, सुनिल नारायण परब, समीर चंद्रकांत ठाकर, ज्योतिबा मारुती आमरोळकर, संदिप भागू पाटील, नारायण नागेश कोचरेकर, विनया विद्याधर मांजरेकर, किरण नरहरी सावंत, नारायण झिलू राऊळ, नितीन सदानंद कदम, सचिन रमेश कदम, दिक्षा द. पेडणेकर, कृष्णा श. हरमलकर, नारायण गजानन सतपाळ, महेश खंडू बरागडे, प्रकाश नाना गवळी आणि गोपाळ नामदेव सावंत आदींचा समावेश आहे.
दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या वारसा हक्काच्या या निर्णयामुळे सफाई कामगारांच्या कुटुंबांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले असून, पालिकेच्या या तत्परतेचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.