सावंतवाडी दि.१२ ऑगस्ट
कोकणातील विद्यार्थ्यांसाठी मुंबई विद्यापीठाने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तळेरे आणि वेंगुर्ले येथील महाविद्यालयांमध्ये लवकरच ‘अप्रेंटिस ओरिएंटल पदवी’ म्हणजेच शिकाऊ उमेदवारीवर आधारित अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी यांनी सावंतवाडी श्री पंचम खेमराज महाविद्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बुधवारी केली. संस्थेचे विश्वस्त लखमराजे भोसले, प्राचार्य दिलीप भारमल प्रा. गणेश मर्गज उपस्थित होते
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला अनुसरून हा रोजगारभिमुख अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना पारंपरिक पदवीचे शिक्षण घेतानाच प्रत्यक्ष उद्योगांमध्ये काम करण्याचा आणि व्यावसायिक कौशल्यांचा अनुभव मिळवण्याची संधी उपलब्ध होणार आहे. तसेच प्रत्यक्ष ऑन-द-जॉब ट्रेनिंगच्या कालावधीत विद्यार्थ्यांना नियमांनुसार दरमहा विद्यावेतन म्हणजेच स्टायपेंड देखील दिले जाणार आहे मुंबई आणि ठाणे येथील महाविद्यालयात हा प्रयोग यापूर्वी सुरू झाला आहे मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तळेरे आणि वेंगुर्ले सारख्या भागात हे कोर्सेस सुरू होत असल्याने स्थानिक विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी आणि रोजगारासाठी मोठ्या शहरांमध्ये स्थलांतर करावे लागणार नाही. हा अभ्यासक्रम व्यावसायिक गरजा आणि उद्योग जगताची सांगड घालून डिझाईन करण्यात आला असून, यामुळे शिक्षण संपताच विद्यार्थ्यांना थेट नोकरी मिळवणे सोपे होईल. पर्यटन मत्स्य औद्योगिक क्षेत्रात काम केल्यामुळे विद्यार्थ्यांना रोजगाराच्या आणि नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहेत पदवी अभ्यासक्रमाच्या सहा सेमिस्टर मध्ये शेवटच्या वर्षी सहा महिने विद्यार्थ्यांनी उद्योगाच्या ठिकाणी जाऊन काम करायचे आहे प्रत्यक्ष उद्योगाच्या ठिकाणी विद्यार्थ्यांना कामाचा अनुभव मिळणार आहे त्यातून त्यांना रोजगार आणि नोकरी प्राप्त होईल भौगोलिक परिस्थितीनुसार महाविद्यालयांना अभ्यासक्रमात स्वायत्तता देण्यात आली आहे असे त्यांनी सांगितले.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणी अंतर्गत महाविद्यालयांना दिल्या जाणाऱ्या स्वायत्ततेबाबत विद्यार्थी आणि पालकांनी मनात कोणताही किंतू किंवा शंका बाळगू नये, असे आवाहनही कुलकर्णी यांनी केले आहे. स्वायत्त महाविद्यालयांमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत नसून उलट त्यांना रोजगाराच्या अधिक चांगल्या संधी उपलब्ध होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.अनेक पालकांमध्ये अशी भीती आहे की, महाविद्यालय स्वायत्त झाल्यामुळे त्याचा विद्यापीठाशी असलेला संबंध संपतो आणि पदवीचे महत्त्व कमी होते. यावर स्पष्टीकरण देताना कुलगुरूंनी सांगितले की, स्वायत्त महाविद्यालये ही विद्यापीठाशी संलग्नच राहतात. विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या अंतिम पदवी प्रमाणपत्रावर मुंबई विद्यापीठाचे नाव आणि लोगो कायम असतो. त्यामुळे या पदवीची अधिकृतता आणि जागतिक मान्यता पूर्णपणे टिकून राहते.बदलत्या काळाची गरज ओळखून स्वायत्त महाविद्यालयांना स्वतःचा अभ्यासक्रम तयार करण्याचे स्वातंत्र्य दिले जाते. यामुळे उद्योग क्षेत्राला आवश्यक असणारे आधुनिक कौशल्याचं शिक्षण विद्यार्थ्यांना मिळते. तसेच, या महाविद्यालयांमध्ये परीक्षा वेळेवर होऊन निकालही जलद गतीने जाहीर होतात, ज्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जात नाही.मुंबई विद्यापीठाने उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महाविद्यालयांना ‘अधिकारप्रदत्त स्वायत्त’ दर्जा दिला आहे. या व्यवस्थेत विद्यापीठ आणि महाविद्यालय संयुक्तपणे पदवी प्रदान करतात. स्वायत्त महाविद्यालयांवर विद्यापीठ आणि युजीसीचे शैक्षणिक नियंत्रण कायम असल्याने पालकांनी घाबरून न जाता या व्यवस्थेकडे मुलांच्या उज्ज्वल भविष्याची संधी म्हणून पहावे, असा विश्वास डॉ. कुलकर्णी यांनी व्यक्त केला आहे. नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी मुंबई विद्यापीठाने २०२४ ला शंभर टक्के केली आहे असे सांगून डॉक्टर कुलकर्णी यांनी पदवी अभ्यासक्रमाकडे अलीकडे विद्यार्थ्यांचा ओढा कमी झाला आहे परंतु नवीन शैक्षणिक धोरण अंतर्गत अभ्यासक्रमात बदल करण्यात आले आहे विद्यार्थ्यांना रोजगाराच्या आणि नोकरीच्या अनुषंगाने शिक्षण देण्यात येत आहे त्यामुळे या पदवी अभ्यासक्रमाना महत्त्व आले आहे सावंतवाडीत मुंबई विद्यापीठाचे उपकेंद्र सुरू होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मुंबई विद्यापीठाचे उपकेंद्र सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात सुरू आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्वतंत्र केंद्र, वेंगुर्ले येथे सागरी संशोधन केंद्र सुरू करण्याचे नियोजन आहे असे त्यांनी सांगितले.