​सावंतवाडी : स्थानिक तरुणांना नोकरीत प्राधान्य देण्यास भाजप आग्रही : आमदार प्रमोद जठार

शेअर करा

सावंतवाडीतील सेवा अभियानादरम्यान जठारांची माहिती; स्थानिक बेरोजगारांच्या हक्कासाठी पाठपुरावा सुरू

​सावंतवाडी ,दि.२४ ऑगस्ट
सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांतील शासकीय कार्यालये तसेच शिक्षक भरतीत स्थानिक उमेदवारांना प्राधान्य मिळावे, यासाठी आपण आग्रही भूमिका घेतली आहे, अशी माहिती भाजपचे कोकण संयोजक आमदार प्रमोद जठार यांनी दिली. या दोन्ही जिल्ह्यांतील ४० ते ५० हजार तरुणांना स्थानिक पातळीवर नोकरीची संधी मिळाल्यास रोजगारासाठी स्थलांतरित झालेले तरुण पुन्हा आपल्या गावात परततील आणि ओसाड पडलेल्या गावांना पुन्हा वैभव प्राप्त होईल. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. प्रथम शिक्षण मंत्री दादा भुसे यांची भेट घेतली जाईल. शिक्षक भरतीत स्थानिक उमेदवारांना प्राधान्य दिले जावे अशी मागणी केली जाणार आहे. यावेळी पालकमंत्री नितेश राणे आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत बरोबर असतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
​सावंतवाडी येथे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या निर्देशानुसार आयोजित ‘सेवा अभियान’ कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.
प्रमोद जठार पुढे म्हणाले की, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध शासकीय खात्यांमध्ये आणि शिक्षण विभागात मोठ्या प्रमाणावर नोकरभरती प्रस्तावित आहे. मात्र, जिल्हाबाहेरील उमेदवारांची निवड होत असल्याने स्थानिक तरुणांना नोकरीसाठी शहरांकडे धाव घ्यावी लागत आहे. त्यामुळे गावोगावच्या घरांना कुलूप लागून गावे ओसाड पडत आहेत. या समस्येवर उपाय म्हणून दोन्ही डोंगराळ जिल्ह्यांत स्थानिक तरुणांचीच भरती केली पाहिजे. जिल्हाबाहेरील शिक्षकांना स्थानिक भाषा समजण्यात अडचणी येतात, तर स्थानिक शिक्षक लाखभर विद्यार्थ्यांना अधिक प्रभावीपणे शिकवू शकतील.
​या मागणीसाठी सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे, रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत आणि शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्यासोबत लवकरच बैठक आयोजित करण्यात येईल. त्यानंतर मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन हा प्रश्न तडीस नेऊ, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
​सेवा अभियानात ३५० निवेदने दाखल:
जनता, प्रशासन आणि सरकार यांच्यात समन्वय साधण्यासाठी भाजपचे सेवा अभियान कार्यरत आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातून लोकांच्या समस्या, महसूल, वीज आणि विकासाशी संबंधित निवेदने स्वीकारण्यात आली आहेत. सावंतवाडीतील या अभियानात एकूण ३५० निवेदने प्राप्त झाली असून, प्रशासकीय पातळीवर त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण प्रयत्नशील आहेत.
कोकणात लहान शेतजमिनी असल्याने पानंद रस्ते देताना अडचणी येतात. मात्र, महसूल विभागातील समस्या लवकरच सोडवल्या जातील, असे सांगताना त्यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कामकाजाचे कौतुक केले. याशिवाय, विजेचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी वीज सबस्टेशन केंद्रांसाठी प्रयत्न सुरू आहेत. तसेच ऑनलाइन ई-पीक पाहणी नोंदणीत नेटवर्क अभावी येणाऱ्या अडचणी दूर करून हमीभावाने भात खरेदी सुलभ केली जाईल. सातार्डे येथील उत्तम स्टील उद्योगासाठी घेतलेल्या जमिनीवर प्रकल्प लवकरात लवकर सुरू व्हावा, यासाठी स्वतः लक्ष घालणार असल्याचे त्यांनी सांगितले.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुण्यात मनुस्मृती बाबत केलेल्या विधानाचा प्रमोद जठार यांनी तीव्र निषेध केला. राहुल गांधी यांच्या वक्तव्यातून त्यांची अपरिपक्वता दिसून येते, अशी टीका करत “पहिले संविधान आणि नंतर धर्म” हे राहुल गांधींना मान्य आहे का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. “आम्ही संविधानाला प्रथम स्थान देतो आणि त्यानंतर धर्मावर बोलतो,” असे जठार यांनी स्पष्ट केले.
​या प्रसंगी भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, जिल्हा सरचिटणीस महेश सारंग, जिल्हा संयोजक संदीप गावडे, मंडळ अध्यक्ष मधुकर देसाई, शहराध्यक्ष सुधीर आडीवरेकर, ओसडी श्री साखरे, प्रसन्ना देसाई, महेश धुरी, दिलीप भालेकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेअर करा