सावंतवाडी : जुन्या जन्म-मृत्यू नोंदीचे डिजिटायझेशन करताना अडचणी; प्रतिज्ञापत्रावर दाखले देण्याची शेतकरी-कामगार संघटनेची मागणी

शेअर करा

सावंतवाडी दि.१ ऑक्टोबर
जुन्या जन्म-मृत्यू नोंदींचे पोर्टलवर डिजिटायझेशन करताना अनेक तांत्रिक अडचणी येत असल्याने नागरिकांना वेळेवर दाखले मिळणे कठीण झाले आहे. या समस्येमुळे शाळा, कॉलेज, नोकरी व इतर शासकीय कामांसाठी लागणाऱ्या दाखल्यांपासून नागरिक वंचित राहत आहेत. या पार्श्वभूमीवर पूर्वीप्रमाणेच स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र (अॅफिडव्हेट) घेऊन जन्म-मृत्यू दाखले वितरित करण्यात यावेत, अशी मागणी शेतकरी व कामगार संघटना सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष वसंत उर्फ अण्णा केसरकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
​जिल्ह्यातील नगरपालिका, नगरपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद कार्यालयांमध्ये शेतकरी, कामगार आणि सामान्य नागरिक दाखल्यांसाठी अर्ज करतात. मात्र, डिजिटायझेशनच्या प्रक्रियेमुळे अर्जदारांना १५ दिवसांनंतर येण्यास सांगितले जाते. दुर्गम व डोंगराळ भागातील जुन्या काळात घरी जन्म झालेल्या नागरिकांच्या नोंदी सापडणे कठीण होत असून, तत्कालीन परिस्थितीत हॉस्पिटल्स किंवा ग्रामपंचायती उपलब्ध नसल्याने अनेक कुटुंबे अडचणीत सापडली आहेत.
​शासकीय यंत्रणा व पोर्टल बंद पडल्यामुळे नागरिकांना महिनाभर वाट पाहावी लागत असून, यामुळे हजारो ग्रामीण नागरिक व विद्यार्थी त्रस्त झाले आहेत. रजिस्टरमध्ये नोंद असताना केवळ जुने भौतिक प्रमाणपत्र उपलब्ध नाही या कारणास्तव डिजिटल दाखला नाकारणे अयोग्य असल्याचे निवेदनात नमूद केले आहे. त्यामुळे डिजिटल प्रमाणपत्राचा जाचक आदेश रद्द करून जुन्या पद्धतीनुसार प्रतिज्ञापत्र स्वीकारून वेळेत दाखले देण्यात यावेत आणि नागरिकांची या त्रासातून मुक्तता करावी, अशी आग्रही मागणी वसंत केसरकर यांनी केली आहे.

शेअर करा