सावंतवाडी : केसरी अलाटी धनगरवाडीतील चिमुकल्यांचा जीव मुठीत धरून शिक्षणाचा प्रवास

शेअर करा

खडतर रस्ते, जंगलवाटा अन् काटेरी पायवाटेवरून दररोज २ ते ३ किमी पायपीट; विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधांची प्रतीक्षा

सावंतवाडी,दि. १६ ऑगस्ट

देश स्वातंत्र्याच्या ८० व्या वर्षात पदार्पण करत असताना आणि चोहीकडे विकासाच्या गप्पा मारल्या जात असताना, केसरी अलाटी धनगरवाडी येथील लहान मुलांच्या वाट्याला मात्र आजही खडतर रस्ते आणि जीवघेणा प्रवासच आला आहे. येथील अंगणवाडीसह पहिली ते सातवीत शिकणाऱ्या चिमुकल्यांना दररोज शाळेत पोहोचण्यासाठी खडक, जंगल आणि काटेरी वाट तुडवत २ ते ३ किलोमीटरची पायपीट करावी लागत आहे.
​जीव मुठीत धरून शिक्षण
केसरी अलाटी धनगरवाडीतील लहान मुलांना पक्क्या रस्त्यावरून सुरक्षितपणे शाळेत जाण्याचे स्वप्न आजही अपूर्णच आहे. या दुर्गम वाटेवर वन्यप्राण्यांचा मोठा धोका असतो, तर पावसाळ्यात ही वाट अधिकच बिकट आणि निसरडी बनते. तरीही शिक्षणाची तीव्र आस असलेली ही मुले रोज जीव मुठीत धरून हा खडतर प्रवास पूर्ण करतात.
​मराठी शाळा वाचवण्याचा बाणा
आज राज्यभरात अनेक मराठी शाळा पटसंख्येअभावी बंद पडण्याच्या मार्गावर असताना, या धनगरवाडीतील मुलांचा मराठी शाळेतच शिक्षण घेण्याचा संघर्ष कौतुकास्पद ठरणारा आहे. ‘मोडेन पण वाकणार नाही आणि मराठी शाळा सोडून कुठेही जाणार नाही’ या जिद्दीने ही मुले दररोज पायपीट करून मराठी शाळेची वाट धरत आहेत.
​शासना समोर सवाल
“ही मुले केवळ एका वाडीपुरती मर्यादित नसून देशाचे भविष्य आहेत. मग देश विकासाच्या महामार्गावर पुढे जात असताना, या चिमुकल्यांच्या हक्काचा साधा रस्ता कधी होणार?” असा उद्विग्न सवाल आता स्थानिक ग्रामस्थ आणि पालकांकडून विचारला जात आहे.
​या लहान मुलांचा हा संघर्ष थांबवण्यासाठी आणि मराठी शाळांचे अस्तित्व टिकवण्यासाठी प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन केसरी अलाटी धनगरवाडीसाठी पक्का रस्ता मंजूर करावा, अशी तीव्र मागणी परिसरातून केली जात आहे.

शेअर करा