​सावंतवाडी:मतदार यादी पुनर्नरीक्षण प्रक्रियेतील त्रुटींमुळे नागरिक त्रस्त

शेअर करा

सावंतवाडीतील जयंत बरेगार यांचा प्रशासनाला सवाल

​सावंतवाडी,दि.३० सप्टेंबर
सध्या सुरू असलेल्या मतदार यादी विशेष सखोल पुनर्नरीक्षण (एसआयआर) प्रक्रियेत प्रशासकीय अनास्थेमुळे सामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप सावंतवाडी येथील ज्येष्ठ नागरिक जयंत बरेगार यांनी केला आहे. अस्पष्ट नोटिसांमुळे होणारा मनस्ताप थांबवून ही प्रक्रिया सुलभ आणि पारदर्शक करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
​आपली व्यथा मांडताना जयंत बरेगार यांनी सांगितले की, त्यांचे सुपुत्र चेतन बरेगार यांना प्रशासनाकडून सुनावणीची नोटीस बजावण्यात आली आहे. या नोटीसमध्ये ‘वडिलांच्या नावात तफावत आहे’ एवढाच उल्लेख करण्यात आला असून, नेमकी तफावत काय आहे याचा कोणताही तपशील दिलेला नाही. तसेच नोटीसमधील संबंधित चौकटीही रिकाम्या सोडण्यात आल्या आहेत. २०१९ च्या मतदानाची स्लिप आणि निवडणूक आयोगाने दिलेल्या अधिकृत ओळखपत्रावर ‘जयंत राघवेंद्र बरेगार’ असे नाव स्पष्ट व अचूक असताना नावात तफावत नेमकी कशी आणि कुठून आली, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
​या अस्पष्ट नोटीसबाबत बरेगार यांनी २९ सप्टेंबर २०२६ रोजी सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा मुख्याधिकारी, सावंतवाडी नगरपरिषद यांच्याकडे लेखी अर्ज दाखल केला आहे. या अर्जाद्वारे त्यांनी नावातील तफावतीचा स्पष्ट तपशील आणि संबंधित कागदपत्रांच्या मूळ प्रती देण्याची मागणी केली आहे. या प्रकरणाची सुनावणी ८ ऑक्टोबर रोजी निश्चित करण्यात आल्यामुळे, पूर्वतयारीसाठी ५ ऑक्टोबरपर्यंत ही कागदपत्रे उपलब्ध करून द्यावीत, अन्यथा सुनावणीची तारीख पुढे ढकलण्यात यावी, अशी विनंतीही त्यांनी प्रशासनाकडे केली आहे.
​वयाच्या या टप्प्यावर कागदपत्रांची जुळवाजुळव करणे, सरकारी कार्यालयांचे फेरे मारणे आणि सुनावणीला उपस्थित राहणे यामुळे ज्येष्ठ नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर बरेगार यांनी प्रशासनासमोर प्रमुख तीन मागण्या मांडल्या आहेत:बजावण्यात येणाऱ्या नोटीसमध्ये नावातील तफावतीचा स्पष्ट व सविस्तर उल्लेख असावा.जुन्या यादीत प्रशासकीय किंवा लेखनिक चुका असल्यास, सध्याच्या ओळखपत्र क्रमांकाच्या (EPIC) आधारे प्रशासनाने स्वतः पडताळणी करून त्या दुरुस्त कराव्यात.सुनावणीपूर्वी नागरिकांना माहिती व मार्गदर्शन मिळण्यासाठी नगरपरिषद कार्यालयात स्वतंत्र मदत कक्ष सुरू करण्यात यावा.
​दरम्यान, ज्या नागरिकांना अशा प्रकारच्या त्रुटींच्या नोटिसा आल्या आहेत, त्यांनी नगरपालिकेत जाऊन त्रुटीबाबत खात्री करण्यासाठी लेखी अर्ज सादर करावा, असे आवाहनही बरेगार यांनी केले आहे. नागरिकांच्या स्वतःच्या चुकीमुळे त्रुटी राहिलेली नसेल, तर ज्यांच्या चुकीमुळे हा गोंधळ निर्माण झाला आहे, त्यांच्याकडूनच योग्य ती दुरुस्ती करून घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, सध्या कोणतीही निवडणूक नसली तरी लोकप्रतिनिधींनी या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन सामान्य नागरिकांचा त्रास कमी करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केली आहे.

शेअर करा