पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे न्यायाची मागणी
सावंतवाडी ,दि.१५ ऑगस्ट
ग्रामपंचायतीवर प्रशासक राज लागू झाल्यानंतर झालेल्या भोंगळ कारभाराचा मोठा फटका स्थानिक ठेकेदारांना बसला आहे. कोट्यवधी रुपयांची थकबाकी न मिळाल्याने इन्सुलि येथील ठेकेदारांनी स्वातंत्र्यदिनी सावंतवाडी पंचायत समितीसमोर एक दिवशीय लाक्षणिक उपोषण छेडले.
कोणताही ठोस शासकीय निर्णय नसताना, प्रशासक काळात झालेल्या विविध विकासकामांची सुमारे २ कोटी २० लाख ५६ हजार ५८० रुपयांची देयके रोखून धरण्यात आल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केला आहे. प्रशासक इतर बाबींवर खर्च करत असताना, ज्यांनी प्रत्यक्ष जनतेच्या सेवेची कामे केली त्यांचीच देयके रोखली जात असल्याबद्दल ठेकेदारांनी तीव्र संताप व्यक्त केला.
उपोषणाची माहिती मिळताच गटविकास अधिकारी निलेश जाधव यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी ठेकेदारांनी स्पष्ट भूमिका घेतली की, इतर जिल्ह्यांतील पत्रांचा हवाला देऊन आमची दिशाभूल करू नये. ‘ठेकेदारांना देयके देता येत नाहीत’ असे मुख्य कार्यकारी अधिकारी, सिंधुदुर्ग यांचे स्पष्ट लेखी पत्र आम्हाला द्यावे, अशी मागणी त्यांनी केली. यावर गटविकास अधिकाऱ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा संबंधित आदेश उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.
गणेशोत्सवासारखा मोठा सण तोंडावर आला असताना कोट्यवधी रुपयांची रक्कम अडकल्याने ठेकेदार अत्यंत हतबल झाले आहेत. “इतर जिल्ह्यांचे निकष आम्हाला न लावता, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी या विषयात तत्काळ लक्ष घालून आम्हाला न्याय मिळवून द्यावा,” अशी विनंती उपोषणकर्त्यांनी केली आहे.
या लाक्षणिक उपोषणात रामचंद्र विष्णू चराटकर, वृषाल विलास पोपकर, ऋषीकेश दत्ताराम पेडणेकर, सचिन शांताराम पालव, नंदकिशोर वासुदेव कोठावळे यांच्यासह अन्य ठेकेदार सहभागी झाले होते. तर सभापती सुष्मिता जाधव, गटविकास अधिकारी निलेश जाधव, पंचायत समिती सदस्य उदय पारिपत्ये, जितेंद्र गावकर व सदा राणे यांनी उपोषणकर्त्यांशी चर्चा करून सकारात्मक तोडगा काढण्याचा प्रयत्न केला.