​सावंतवाडी : सहकारातूनच प्रत्येक व्यक्तीचे जीवन आर्थिक सक्षम बनेल: जिल्हा फेडरेशन अध्यक्ष सुनील राऊळ

शेअर करा

​सावंतवाडी, दि. १ जुलै
सहकार चळवळ ही समाजातील प्रत्येक घटकाला प्रगतीपथावर नेणारी अत्यंत महत्त्वाची चळवळ आहे. या सहकारातूनच प्रत्येक व्यक्ती आपले जीवन आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवू शकते. बदलत्या काळानुसार शासनाने सहकार कायद्यात अनेक सकारात्मक बदल केले असून, या माध्यमातून समाजाला अधिकाधिक सेवा देण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे आजच्या तरुण पिढीने आणि युवकांनी या सहकार चळवळीचा सखोल अभ्यास करून त्यात हिररीने सहभाग घेणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष सुनील राऊळ यांनी केले.


​सहकार सप्ताहनिमित्त सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशन मर्या. सावंतवाडी आणि सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने येथील पंचम खेमराज महाविद्यालयात ‘सहकारातून विकास’ या विषयावर मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी व्यासपीठावर सावंतवाडीचे सहाय्यक निबंधक सुनील मरभळ, जिल्हा पतसंस्था फेडरेशनचे कार्याध्यक्ष जॉय डॉन्टस, संचालक ॲड. समीर वंजारी, सैनिक पतसंस्थेचे अध्यक्ष व फेडरेशनचे संचालक बाबुराव कविटकर, सहाय्यक निबंधक कार्यालयाचे अधिकारी राजन आरोंदेकर, फेडरेशनचे व्यवस्थापक महेश्वर कुंभार, प्रा. प्रसाद बर्वे आणि प्रा. शेटकर प्रामुख्याने उपस्थित होते.


​यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना सहाय्यक निबंधक सुनील मरभळ यांनी सहकार क्षेत्रातील रोजगाराच्या संधींवर प्रकाश टाकला. ते म्हणाले की, सहकार खात्यामध्ये काम करण्यासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता विद्यार्थ्यांनी प्राप्त करणे गरजेचे आहे. सहकार चळवळीच्या माध्यमातून आपण समाजातील तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचू शकतो. पतसंस्था, विकास संस्था, गृहनिर्माण संस्था, साखर कारखाने आणि दुग्ध संस्था यांसारख्या विविध सहकारी संस्था स्थापन करून आपण अनेक हातांना काम आणि कुटुंबांना आर्थिक स्थैर्य देऊ शकतो. ही केवळ एक चळवळ नसून लोकसेवेचे आणि रोजगाराचे एक मोठे माध्यम आहे, असे त्यांनी सांगितले.
​या मार्गदर्शन शिबिराला महाविद्यालयातील विद्यार्थी आणि प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन आणि नियोजन सहकार विभाग व फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांनी चोखपणे पार पाडले.

शेअर करा