सावंतवाडी,दि.१९ जून
सांगेली येथील एका दाम्पत्याला किरकोळ कारणावरून लाकडी दांड्याने आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी दोन जणांवर सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भास्कर वामन गावडे (वय ५०) आणि शुभम दत्ताराम गावडे (वय २९, दोघे रा. सांगेली) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना गुरुवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास सांगेली येथील तक्रारदार पुरुषोत्तम रामचंद्र राऊळ यांच्या घरासमोर घडली. “तुम्ही माझी गावात इज्जत घालवली,” असे म्हणत संशयित आरोपी भास्कर गावडे व शुभम गावडे यांनी पुरुषोत्तम राऊळ आणि त्यांच्या पत्नी सौ. प्रमिला पुरुषोत्तम राऊळ यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर दोन्ही संशयितांनी दाम्पत्याला लाकडी दांड्याने डोक्यावर, हातावर तसेच लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. तसेच ‘तुम्हाला सोडणार नाही’ अशी जीवे मारण्याची धमकी दिली.
या मारहाणीनंतर पीडित दाम्पत्याने सावंतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी संशयित आरोपी भास्कर गावडे व शुभम गावडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार दीपक शिंदे करीत आहेत.