​सावंतवाडी : सावंतवाडीत भरवस्तीत दिवसाढवळ्या चोरी; ज्येष्ठ महिलेची सोन्याची चेन लांबवली

शेअर करा

सावंतवाडी,दि. १० जून
शहरातील अत्यंत गजबजलेल्या खासकीलवाडा येथे कॉसमॉस बिल्डिंग परिसरात आज सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास एक धक्कादायक आणि धाडसी चोरीची घटना घडली. मोटारसायकलवरून आलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी एका ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील ५० हजार रुपये किंमतीची सोन्याची चेन हिसकावून पोबारा केला. या घटनेमुळे सावंतवाडी शहरात एकच खळबळ उडाली आहे.
​याप्रकरणी श्रीमती रंजना पांडुरंग ठाकूर (वय ५९, रा. कॉसमॉस पॅराडाईज, सावंतवाडी) यांनी सावंतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.


​माहिती विचारण्याच्या बहाण्याने आले चोरटे:
​मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी श्रीमती रंजना ठाकूर या त्यांच्या एका सहकारी महिलेसोबत कॉसमॉस पॅराडाईज बिल्डिंगच्या खाली उभ्या होत्या. याच वेळी एक अनोळखी तरुण माहिती विचारण्याच्या बहाण्याने त्यांच्याजवळ आला. “या बिल्डिंगमध्ये शेअर मार्केटचे काम कोण करतात?” अशी चौकशी त्याने ठाकूर यांच्याकडे सुरू केली. त्याच्या बोलण्यावरून संशय आल्यामुळे श्रीमती ठाकूर यांनी त्याला सोसायटीच्या चेअरमनकडे विचारपूस करण्यास सांगितले.


​क्षणाचाही विलंब न लावता चेन हिसकावली
​हा संवाद सुरू असतानाच, श्रीमती ठाकूर या पाठमोऱ्या होताच सदर तरुणाने क्षणाचाही वेळ न घालवता त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन जोरात हिसकावली. बिल्डिंगच्या गेटबाहेर त्याचा दुसरा साथीदार काळ्या रंगाची दुचाकी चालू ठेवून आधीच सज्ज उभा होता. चेन चोरताच तो धावत जाऊन दुचाकीवर बसला आणि दोघांनी जेलच्या दिशेने वेगाने पोबारा केला.


​श्रीमती ठाकूर यांनी तात्काळ आरडाओरडा केल्याने परिसरातील नागरिकांनी स्वतःच्या दुचाकीवरून चोरट्यांचा काही अंतरापर्यंत पाठलाग केला, परंतु चोरटे पळून जाण्यात यशस्वी ठरले. संशयितांच्या पेहरावावरून ते परप्रांतीय असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
​सीसीटीव्ही कॅमेरे बंद; नगरसेविका आक्रमक
​घटनेची माहिती मिळताच स्थानिक नगरसेविका स्नेहा नाईक यांनी तातडीने पोलिसांना याची माहिती देत घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी पोलिसांना परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे आवाहन केले. मात्र, शहरातील संभाजी चौक येथील सीसीटीव्ही बंद असल्याचे आणि जेल परिसरातील फुटेज अस्पष्ट असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. यावर तीव्र नाराजी व्यक्त करत नगरसेविका नाईक यांनी पोलिसांना या संदर्भात लेखी पत्र देणार असल्याचे स्पष्ट केले.


​घटनेची माहिती मिळताच सावंतवाडी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. कॉसमॉस पॅराडाईज समोरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दोन संशयित व्यक्ती दुचाकीवरून जाताना कैद झाल्या आहेत.
​”सध्या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, शहरातील विविध भागांतील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले आहे. संशयित दुचाकीस्वार कॅमेऱ्यात दिसले असले, तरी अद्याप त्यांची स्पष्ट ओळख पटलेली नाही.” असे सहाय्यक पोलीस निरीक्षक माधुरी मुळीक यांनी बोलताना सांगितले.


​भरवस्तीत आणि दिवसाढवळ्या घडलेल्या या चोरीच्या घटनेमुळे सावंतवाडीतील नागरिकांमध्ये, विशेषतः महिला वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांनी या चोरांचा लवकरात लवकर छडा लावावा, अशी मागणी केली जात आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक माधुरी मुळीक करत आहेत.

शेअर करा