सावंतवाडीत जन्मनोंद दाखले रखडल्याने नागरिकांमध्ये असंतोष; पर्यायी व्यवस्था करण्याची माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांची मागणी

शेअर करा

​सावंतवाडी, दि. २२ जून


गेल्या दोन आठवड्यांपासून सावंतवाडी नगरपालिकेकडून जन्मनोंद दाखले मिळत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. ‘सीआरएस’ (CRS) पोर्टलमध्ये येत असलेल्या तांत्रिक अडचणींमुळे हे दाखले रखडले असून, प्रशासनाने यावर तात्काळ पर्यायी व्यवस्था करावी, अशी मागणी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी केली आहे.
​याबाबत अधिक माहिती देताना बबन साळगावकर यांनी सांगितले की, सध्या शाळा-कॉलेजचे प्रवेश सुरू असून पासपोर्ट, आधार कार्ड व इतर महत्त्वाच्या कामांसाठी जन्मनोंद दाखल्याची अत्यंत आवश्यकता आहे. मात्र, गेल्या पंधरा दिवसांपासून नागरिकांना नगरपालिकेतून हे दाखले मिळत नसल्याच्या तक्रारी माझ्याकडे प्राप्त झाल्या आहेत.
​या संदर्भात प्रशासनाकडे विचारणा केली असता, संपूर्ण महाराष्ट्रात ‘सीआरएस’ पोर्टल अपडेट करण्याचे काम सुरू असून, जिल्हा स्तरावरून हे पोर्टल ऑपरेट होताना त्यात ‘एरर’ येत असल्याचे सांगण्यात आले. पोर्टल अपडेटचे कारण पुढे करून नागरिकांना ताटकळत ठेवणे योग्य नाही. जन्मनोंद दाखला मिळवणे हा नागरिकांचा हक्क असून तो वेळेत मिळणे गरजेचे आहे.
​पोर्टलवरील तांत्रिक अडचण लक्षात घेता, शासनाने याची गंभीर दखल घ्यावी. जोपर्यंत ऑनलाइन यंत्रणा पूर्ववत होत नाही, तोपर्यंत पर्यायी व्यवस्था म्हणून जुन्या पद्धतीचा अवलंब करावा. ज्यांची जन्मनोंद आधीच झालेली आहे, त्यांचे दाखले दोन्ही रजिस्टर तपासून लेखी स्वरूपात द्यावेत, अशी मागणी साळगावकर यांनी केली आहे.

शेअर करा