सावंतवाडी : सेवानिवृत्त आयुर्वेद-युनानी प्राध्यापकांच्या वेतन पडताळणीसाठी ऑफलाइन पद्धतीची मागणी

शेअर करा

ऑनलाइन प्रक्रिया क्लिष्ट ठरत असल्याने सिंधुदुर्गसह राज्यभरातील सेवानिवृत्त अध्यापकांची शासनाकडे मागणी; सेवापुस्तक पूर्ततेत अडचणी.

सावंतवाडी,दि. २२ जून
महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभाग, संचालनालय लेखा व कोषागारे वेतन पडताळणी पथकाद्वारे राज्यातील खाजगी अनुदानित आयुर्वेद व युनानी महाविद्यालये आणि संलग्नित रुग्णालयांतून प्राध्यापक म्हणून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या सेवापुस्तकाची पूर्तता करण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने वेतन पडताळणी करावी लागत होती. मात्र, ही ऑनलाइन पद्धत सिंधुदुर्ग जिल्ह्यासह महाराष्ट्रातील बहुसंख्य भागांमध्ये अत्यंत क्लिष्ट व अडचणीची ठरत होती. त्यामुळे ही वेतन पडताळणी ऑफलाइन पद्धतीने करण्यात यावी, अशी वारंवार मागणी संबंधित सेवानिवृत्त अध्यापकांकडून केली जात होती.


​या गंभीर समस्येची दखल घेत माजी शिक्षणमंत्री तथा सावंतवाडी विधानसभा मतदार संघाचे आमदार श्री. दीपक केसरकर यांनी संचालक, लेखा व कोषागारे, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्याकडे यासंदर्भात सातत्याने पाठपुरावा करून ऑफलाइन पडताळणीची मागणी केली होती.


​आमदार केसरकर यांच्या या प्रयत्नांना अखेर यश आले असून, प्रशासनाने ही मागणी मान्य केली आहे. त्यानुसार ३०/१२/२०२६ किंवा त्यापूर्वी सेवानिवृत्त झालेल्या अध्यापकांच्या सेवापुस्तकाची पडताळणी एक ‘विशेष बाब’ म्हणून ऑफलाइन पद्धतीने करण्यास परवानगी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे राज्यातील अनेक सेवानिवृत्त अध्यापकांची सेवापुस्तक पडताळणी आता सोपी व सुलभ होणार असून त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आमदार श्री. दीपक केसरकर यांच्या यशस्वी प्रयत्नांबद्दल संबंधित सेवानिवृत्त अध्यापकांनी त्यांचे मनापासून आभार मानले आहेत.

शेअर करा