आपत्ती प्रसंगी घाबरून न जाता डोकं शांत ठेवून योग्य निर्णय घ्या
आपण आपत्ती मधून निश्चितच बाहेर याल….
राजेंद्र लोखंडे
मुख्य अधिकारी, आपत्ती व्यवस्थापन मुंबई महानगरपालिका.
सावंतवाडी ,दि.२२ ऑगस्ट
सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचालित श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष (IQAC) व एनसीसी विभाग यांच्यावतीने
महाविद्यालयामध्ये आपत्ती व्यवस्थापन या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेसाठी प्रमुख अतिथी म्हणून मुंबई महानगरपालिकेचे निवृत्त सहाय्यक मुख्य अधिकारी ( आपत्ती व्यवस्थापन) अॅड.राजेंद्र लोखंडे उपस्थित होते. सोबतच मुंबई महानगरपालिका निवृत्त प्रमुख अधिकारी (दुकाने व आस्थापना ) अॅड. सुनील लाड. मुंबई महानगरपालिका उपअधीक्षक( निवडणूक विभाग) श्री संतोष परब, सामाजिक कार्यकर्ते अॅड.नकुल पार्सेकर,
महाविद्यालयाच्या एनसीसी आर्मी विभागाचे डॉ. एस ए देशमुख, नेव्ही विभागाचे डॉ .व्ही टी अपराध,महाविद्यालयाच्य प्राणीशास्त्र विभागाचे विभागप्रमुख प्रा . डॉ. गणेश मर्गज,महाविद्यालयातील एनसीसी आर्मी व नेव्ही चे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आर्मी विभागाचे डॉ. एस ए देशमुख यांनी केले. विविध नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तीच्या वेळी विद्यार्थ्यांनी कोणती काळजी घ्यायला हवी, जीवितहानी आणि वित्तहानी कशी टाळता येईल या संदर्भात मार्गदर्शन होणे अत्यंत आवश्यक आहे याच उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे असे ते म्हणाले.
प्रमुख अतिथी व मार्गदर्शक अॅड.राजेंद्र लोखंडे निवृत्त सहाय्यक मुख्य अधिकारी आपत्ती व्यवस्थापन मुंबई महानगरपालिका यांनी नैसर्गिक आपत्ती, मानवनिर्मित आपत्ती प्रसंगी घ्यायची काळजी, आपत्कालीन परिस्थितीमध्ये करायच्या उपाययोजना,बचाव कार्य, सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक प्राथमिक ज्ञान याविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली व अनेक प्रात्यक्षिके विद्यार्थ्यांकडून करून घेतली.
आपत्तीच्या कोणत्याही प्रसंगामध्ये घाबरून न जाता डोकं अतिशय शांत ठेवून प्रसंगावधान राखून योग्य निर्णय घेणे हेच आपत्तीवर मात करण्यासाठी योग्य ठरते. आपत्ती प्रसंगी माणसे घाबरून जाऊन चुकीचे निर्णय घेतात आणि त्यामुळेच ते मृत्यूच्या दारात ढकले जातात. नैसर्गिक आपत्ती भूकंप, पूर, चक्रीवादळ, त्सुनामी,त्याचबरोबर अपघात, आग लागणे आदी आपत्तीच्या वेळी प्रसंगावधान राखून स्वतःचा बचाव कसा करावा याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. आपत्तीपूर्व तयारी कशी करावी त्याचबरोबर आपत्तीवेळी तातडीने करायच्या उपाययोजना त्यांनी सांगितल्या. पूर,भूकंप, लँड स्लाइडिंग,चक्रीवादळ अशा नैसर्गिक आपत्तीच्या नंतर मदत व बचाव कार्याबाबत त्यांनी माहिती दिली. जिथे आपत्ती घडते तेथे कोणतीही साधने उपलब्ध नसतात अशावेळी बचाव कार्य करताना तेथे उपलब्ध असलेल्या काही नैसर्गीक साधनांच्या सहाय्याने जखमी झालेल्या रुग्णांना रुग्णवाहिकेपर्यंत घेऊन जाण्याची अनेक प्रात्यक्षिके त्यांनी करून दाखवली. गॅस सिलेंडर लीक झाल्यास तसेच एखाद्या आस्थापनाला आग लागल्यास अग्निशमनासाठी वापरण्यात येणारे अग्निशमन उपकरण याचा वापर कसा करावा याचे प्रात्यक्षिक त्यांनी विद्यार्थ्यांना दाखविले व त्यांच्याकडून ते करून घेतले. संकट प्रसंगी घाबरून न जाता योग्य निर्णय घेण्यासाठी या प्रशिक्षणाचा मोठा फायदा विद्यार्थ्यांना झाला. सूत्रसंचालन डॉ.एस एस देशमुख यांनी केले व आभार मानले