राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची प्रभावी व सकारात्मक अंमलबजावणी करा : मुंबई विद्यापीठ कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी
सावंतवाडी,दि. १२ ऑगस्ट
विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास आणि ‘विकसित भारत’ घडवण्यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे अत्यंत महत्त्वाचे पाऊल आहे. हे धोरण पूर्णपणे विद्यार्थी-केंद्री असून, याची अंमलबजावणी सकारात्मक व प्रभावीपणे होणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रोफेसर रवींद्र कुलकर्णी यांनी सावंतवाडी येथे केले.
सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री पंचम खेमराज (एस. पी. के.) महाविद्यालयात मुंबई विद्यापीठाच्या वतीने आयोजित ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण’ विषयावरील जिल्हास्तरीय कार्यशाळेत ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.
पर्यटन व जैवविविधतेला पूरक अभ्यासक्रमावर भर:कुलगुरू प्रा. कुलकर्णी पुढे म्हणाले की, “सिंधुदुर्ग हा पर्यटन आणि समृद्ध जैवविविधता लाभलेला जिल्हा आहे. त्यामुळे येथील स्थानिक गरजांनुसार आणि रोजगारनिर्मितीला चालना देणारे कोर्सेस अभ्यासक्रमात समाविष्ट करणे गरजेचे आहे. जागतिक स्पर्धेत विद्यार्थ्यांना सक्षमपणे उभे करणे हा या धोरणाचा मुख्य उद्देश आहे.”
कार्यक्रमाची रूपरेषा आणि प्रमुख उपस्थिती
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे कार्यकारी विश्वस्त व मुंबई विद्यापीठाचे सिनेट सदस्य युवराज लखमराजे भोंसले होते. त्यांनी प्रास्ताविकात कुलगुरूंचे आभार मानताना सांगितले की, जिल्ह्यातील स्थानिक गरजा, उद्योजकता आणि रोजगाराच्या संधी लक्षात घेऊन अभ्यासक्रमांची आखणी होणे आवश्यक आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक एस. पी. के. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. एल. भारमल यांनी केले. स्वायत्त व बिगर-स्वायत्त महाविद्यालयांमधील एन.ई.पी. अंमलबजावणी, प्राध्यापकांचा कार्यभार आणि सहा व्हर्टिकल्स या विषयांवर मार्गदर्शन करणे हा या कार्यशाळेचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या कार्यशाळेस मुंबई विद्यापीठाच्या विविध विभागांचे प्रमुख आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व प्रमुख महाविद्यालयांचे प्राचार्य, NEP समन्वयक, IQAC समन्वयक व परीक्षा समिती प्रमुख उपस्थित होते:
प्रमुख उपस्थिती: डॉ. बांबर्डेकर (कॉमर्स डीन), डॉ. सुचित्रा नाईक (ठाणे), डॉ. अनिता आवटी (खेड), डॉ. प्रवीण सिनकर (डेटा ॲनालिसिस), प्रा. डी. टी. देसाई (संस्था संचालक). प्राचार्य: डॉ. स्मिता सुरवसे (कुडाळ), प्रा. अरुण मर्गज (नाथ पै), डॉ. चव्हाण (वैभववाडी), डॉ. कुनुरे (देवगड), डॉ. गोविंद काजरेकर (गोगटे वाळके), डॉ. धनराज गोस्वामी (खर्डेकर), प्रा. समीर तारी (शिरगाव), डॉ. कैलास राबते (मालवण), डॉ. यू. एल. देठे (दोडामार्ग), डॉ. सुभाष सावंत (हळबे), प्रा. डी. व्ही. मिराशी (कट्टा), प्रा. सचिन पाटकर (अण्णा राऊळ महाराज महाविद्यालय) आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. एस. एम. बुवा यांनी केले, तर उपस्थितांचे आभार डॉ. एस. ए. देशमुख यांनी मानले.