Sawantwadi : दुष्काळसदृश परिस्थितीत तिलारी कालव्याचे पाणी बंद करू नका

शेअर करा

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा इशारा

​सावंतवाडी,दि.२२ ऑक्टोबर
एल निनोच्या प्रभावामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात, विशेषतः सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्यात सरासरीपेक्षा खूप कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे सध्याच पाणीटंचाईची भीषण समस्या निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत तिलारी कालवा नूतनीकरण व देखभाल-दुरुस्तीच्या कामांसाठी कालव्यातील पाणी बंद करण्याचा निर्णय पाटबंधारे विभागाने तातडीने मागे घ्यावा, अन्यथा मनसेतर्फे हे काम तीव्र विरोध करून बंद पाडले जाईल, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिला आहे.
​यासंदर्भात मनसेचे जिल्हाध्यक्ष ॲड. अनिल केसरकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने सिंधुदुर्ग पाटबंधारे प्रकल्प (बांधकाम विभाग, चराठे) यांच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदन सादर केले आहे.
​चालू वर्षी राज्यात व जिल्ह्यात पर्जन्यमान अत्यंत कमी झाले आहे. शेती, बागायतीसोबतच आतापासूनच पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे.
​ तिलारी धरणाचे कालवे ज्या गावांमधून जातात, तेथे पाणी जमिनीत मुरल्यामुळे गावातील विहिरींची पाण्याची पातळी वाढते. कालव्यात पाणी सोडल्याने जनतेला टंचाई भासत नाही.
​ ऑक्टोबर २०२६ ते मे २०२७ या कालावधीत कालवा नूतनीकरणासाठी पाणी बंद ठेवण्याची नोटीस प्रसिद्ध झाली आहे. परंतु, टंचाईच्या काळात बांदा शाखा कालव्यातील पाणी बंद केल्यास विलवडे, वाफोली, बांदा, इन्सुली व परिसरातील गावांमध्ये विहिरींची पाणीपातळी खालावून तीव्र टंचाई निर्माण होईल, अशी शक्यता या निवेदनाद्वारे व्यक्त केली आहे.
​दुष्काळसदृश परिस्थितीत नवीन बांधकामांवर खर्च न करता पाणी टंचाई दूर करण्यावर भर देण्याचे शासनाचे धोरण आहे. अशा वेळी कालव्याची कामे काढून पाणी बंद करणे अयोग्य आहे.
​त्यामुळे प्रशासनाने स्थानिक जनतेचा विरोध डावलून व पाणीटंचाईकडे दुर्लक्ष करून कालव्याची कामे सुरू करण्याचा प्रयत्न केल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना काम बंद पाडेल, असा इशारा देण्यात आला आहे.
​या निवेदनावर मनसे जिल्हाध्यक्ष ॲड. अनिल केसरकर, सावंतवाडी तालुका अध्यक्ष मिलिंद सावंत आणि शहर अध्यक्ष अँड राजू कासकर यांनी दिले आहे.

शेअर करा