सावंतवाडी : डॉ स्नेहा राणे कोकण भूषण पुरस्कार जाहीर

शेअर करा

सावंतवाडी, दि. ७ जून
​ज्येष्ठ लेखिका डॉ. स्नेहा समीर राणे यांना पत्रकारिता आणि साहित्यिक क्षेत्रातील त्यांच्या बहुमूल्य योगदानाबद्दल यंदाचा मानाचा “कोकण भूषण” पुरस्कार जाहीर झाला आहे.


​गेल्या २४ वर्षांपासून वर्तमानपत्रांच्या माध्यमातून समाजकार्य करणारे, तसेच नवीन वाचक, वृत्तपत्र लेखक आणि मुक्त पत्रकार घडवणारे महाराष्ट्रातील प्रसिद्ध मासिक “कोकणदीप”च्या २४ व्या वर्धापन दिनानिमित्त या पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. वर्धापन दिनाचे औचित्य साधून सामाजिक, शैक्षणिक आणि पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या समाजसेवकांना विविध पुरस्कारांनी गौरविण्यात येणार असून, त्यात डॉ. स्नेहा राणे यांना “कोकण भूषण” पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे.


​मूळच्या वेंगुर्ले-तुळस येथील सुकन्या आणि कणकवली-जानवली येथील स्नुषा असलेल्या डॉ. स्नेहा राणे यांनी गेल्या ४५ वर्षांत कोकण व मुंबईतील विविध वृत्तपत्रे, दिवाळी अंक आणि त्रैमासिकांमधून मराठी व मालवणी भाषेतून सातत्यपूर्ण लेखन केले आहे. त्यांच्या साहित्यिक प्रवासात अनेक मानाचे पुरस्कार त्यांच्या नावावर आहेत. त्यांच्या “देवाक काळजी” या मालवणी कथासंग्रहाला अकोला येथील राज्यस्तरीय बोलीभाषा पुरस्कार, तर “शहर आणि मी” या मराठी कवितासंग्रहाला थोर कवयित्री शांताबाई शेळके पुरस्कार मिळाला आहे. तसेच ऑक्टोबर २०२५ मध्ये प्रकाशित झालेल्या त्यांच्या “बाळभूक” या पहिल्याच मराठी कादंबरीला अल्पावधीतच पाच राज्यस्तरीय पुरस्कार लाभले आहेत.


​साहित्य क्षेत्रासोबतच पत्रकारिता आणि नाट्य क्षेत्रातही त्यांनी आपला ठसा उमटवला आहे. मुंबई पत्रकार संघातून क्राईम रिपोर्टिंग करताना त्यांनी “पत्रभूषण” पुरस्कार पटकावला होता. याशिवाय, ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’ (NSD, दिल्ली) येथून नाट्य प्रशिक्षण पूर्ण करून त्यांनी अनेक नाटकांचे लेखन व सादरीकरण केले आहे. ‘झी टॉकीज’च्या कथानक स्पर्धेतही त्यांच्या पटकथेची पहिल्या पाचमध्ये निवड झाली होती. मुंबई, रत्नागिरी आणि ओरोस आकाशवाणी केंद्रांवरून त्यांच्या कथा, कविता आणि ललित बंधांचे वाचन झाले आहे.
​लेखनाव्यतिरिक्त मुंबईच्या ‘निर्मला निकेतन’ या सामाजिक संस्थेतून प्रशिक्षण घेऊन त्या विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय योगदान देत असतात. त्यांच्या याच चौफेर आणि भरीव कामगिरीची दखल घेऊन त्यांना “कोकण भूषण” पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. या यशाबद्दल राज्यभरातून, तसेच साहित्यिक आणि पत्रकार बांधवांकडून डॉ. स्नेहा राणे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

शेअर करा