सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आठही तालुक्यांत दुष्काळ; बेसुमार वृक्षतोड अन् सुल्तानी कारभार कारणीभूत: डॉ. जयेंद्र परुळेकर

शेअर करा

सावंतवाडी दि.१ ऑक्टोबर
पावसाळा अधिकृतरित्या अजून संपलेला नसून परतीचा पाऊस बाकी असतानाच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आठही तालुक्यांत प्रशासनाकडून दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. सर्वाधिक पर्जन्यमान होणाऱ्या या जिल्ह्यात उगम पावलेले हे संकट केवळ अस्मानी नसून, सह्याद्रीच्या पट्ट्यात होणारी बेसुमार वृक्षतोड व सुल्तानी कारभार याला कारणीभूत असल्याचा घणाघाती आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हा प्रवक्ता डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी केला आहे.
​’सुपर अल निनो’मुळे राज्यभरावर दुष्काळाचे सावट असून राज्यातील सुमारे २८५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर झाला आहे. मात्र, कोकणातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत सिंधुदुर्गातील आकडेवारी आणि परिस्थिती धक्कादायक आहे. यावर्षी रायगडमध्ये ९१ टक्के आणि रत्नागिरीत ८५ टक्के पाऊस झाला असताना सिंधुदुर्गात मात्र तो केवळ ७४ टक्केच नोंदवला गेला आहे. परिणामी, रत्नागिरीत केवळ तीन आणि रायगडमध्ये एका तालुक्यात दुष्काळ जाहीर झाला असताना सिंधुदुर्गात मात्र आठही तालुक्यांत दुष्काळाची भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे.
​ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात पावसाने सलग दडी मारल्याने जिल्ह्यातील भात पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. आधीच वाढती महागाई आणि बेरोजगारीने जनता त्रस्त असताना, या दुष्काळामुळे सर्वसामान्य नागरिकांची अवस्था “दुष्काळात तेरावा महिना” अशी झाली आहे. सप्टेंबरच्या अखेरीसच ही परिस्थिती ओढवल्याने येणाऱ्या हिवाळ्यातच जिल्ह्यात टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ येणार असून, आगामी उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची चिन्हे आहेत.
​प्रशासनाने तातडीने संभाव्य पाणीटंचाईचे नियोजन आखून उपाययोजना कराव्यात, जेणेकरून तीव्र उन्हाळ्यात सामान्य जनतेला दिलासा मिळेल, अशी मागणी डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.

शेअर करा