सावंतवाडी : “शैक्षणिक संस्थांकडून वह्या-पेन खरेदीची सक्ती; दोषींवर कारवाईची मागणी”

शेअर करा

“स्टेशनरी विक्रेत्यांचा इशारा : कारवाई होईपर्यंत लढा सुरूच; कराड येथील उपोषणाला पाठिंबा”

सावंतवाडी ,दि.२८ मे 
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शैक्षणिक संस्थांमध्ये
बेकायदेशीर रित्या वह्या, पेन आदी शैक्षणिक साहित्यांची विक्री केली जात आहे. अनुदानीत, सीबीएससी मंडळाच्या संस्थाकडून शासन आदेश पाळला जात नाही, खरेदीची सक्ती केली जात आहे. त्यामुळे या शाळांवर कारवाई करण्यात यावी, ती होईपर्यंत आमचा लढा सुरू राहील. आमचा लढा आमच्या पोटापाण्यासाठी आहे. कराडमध्ये स्टेशनरी विक्रेत्यांनी केलेल्या उपोषणाला आमचं समर्थन आहे, असे मत स्टेशनरी संघटनेचे राज्य कमिटी सदस्य पुरूषोत्तम कुडतरकर यांनी व्यक्त केले. तर काही घाटमाथ्यावरील शिक्षक जिल्हा परिषद शाळांत देखील वह्या विक्रीचा धंदा करत असून शिक्षकांनी विद्यादानाच काम करावं, धंदा करायला आम्ही विक्रेते आहोत, असे विधान जिल्हाध्यक्ष साईशकुमार केसरकर यांनी केले. आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

यावेळी राज्य कमिटी सदस्य श्री. कुडतरकर म्हणाले, शाळांमध्ये वह्या विक्रीचा व्यापार चालणार नाही असे शासन आदेश असूनही शाळांकडून ही विक्री होत आहे. शिक्षणमंत्र्यांचे, पालकमंत्र्यांचे आदेश असूनही काही शाळांच्या संस्थांनी दुकानेच थाटली आहेत. हा नियमांचा भंग असून येत्या चार दिवसांत जिल्ह्याची बैठक घेऊन आंदोलनाची पुढील दिशा ठरवणार आहोत. या शिक्षण संस्था शिक्षणमंत्री, पालकमंत्री यांचे आदेश जुमानत नसतील तर या लोकांवर कारवाई करणार कोण ? असा सवाल त्यांनी केला.

जिल्हाध्यक्ष श्री. केसरकर म्हणाले, जिल्हा परिषद शाळांतही हे प्रकार होत असून मुलांना वह्या घेण्यासाठी सक्ती केली जात आहे. शिक्षकांनी शिक्षण देण्याचे काम करावे, धंदा करू नये. आम्ही धंदा करायला बसलो आहोत. कर देखील भरत आहोत असं मत व्यक्त केले.कराड येथे सुरू असलेल्या स्टेशनरी विक्रेत्यांच्या उपोषणाला त्यांनी पाठिंबा दिला. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातून देखील‌ त्या ठिकाणी जाणार असल्याचे सांगितले. यावेळी सिंधुदुर्ग स्टेशनरी संघटनेचे अध्यक्ष साईशकुमार केसरकर, सावंतवाडी स्टेशनरी संघटना तालुकाध्यक्ष नित्यानंद कोरगावकर, राज्य कमिटी सदस्य पुरुषोत्तम कुडतरकर, सोहम पेडणेकर, शेखर पेडणेकर, प्रवीण आईर, सुनील केसरकर, अण्णा मठकर, संदीप सावंत, प्रसाद माधव, ऋतिक कोरगावकर, दीपक सावंत, बाळकृष्ण पेडणेकर, समीर घाडीगांवकर, नारायण नाईक आदी उपस्थित होते

शेअर करा