सावंतवाडी : ‘ओंकार’ हत्तीच्या वावराने इन्सुली, वाफोली परिसरात शेतकऱ्यांची घाबरगुंडी

शेअर करा

सावंतवाडी:, दि.०८ जून
गोवा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रचंड चर्चेत असलेला ‘ओंकार’ नावाचा जंगली हत्ती गेल्या काही दिवसांपासून सावंतवाडी तालुक्यातील वाफोली आणि इन्सुली परिसरात मुक्तपणे वावरत आहे. या हत्तीने परिसरातील शेती व काजू बागायतींचे मोठे नुकसान केले असून, आता भातशेतीचा हंगाम सुरू असताना शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. काही दिवसांपूर्वीच शेजारील दोडामार्ग तालुक्यातील मोर्ले येथे एका शेतकऱ्याला हत्तीने पायदळी तुडवून मारल्याच्या घटनेमुळे इन्सुली व वाफोली परिसरातील शेतकऱ्यांची चिंता अधिकच वाढली आहे.


​दरम्यान, रविवारी ‘ओंकार’ हत्ती इन्सुली येथील बांदा–सावंतवाडी महामार्गालगत आल्याने परिसरात वावरत आहे. हत्ती महामार्गाच्या अगदी जवळ आल्याची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, युवक आणि लहान मुलांनी त्याला पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. अनेकांनी मोबाईलवर त्याचे फोटो आणि व्हिडिओ काढले, तर महामार्गावरील वाहनचालकही हत्तीला पाहण्यासाठी थांबल्याने काही काळ वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता.


​घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. हत्तीने महामार्गावर येऊ नये आणि गर्दीच्या दिशेने चाल करून जाऊ नये, यासाठी कर्मचाऱ्यांनी केळी दाखवून त्याला महामार्गापासून दूर नेण्याचे प्रयत्न केले. अथक प्रयत्नांनंतर वनविभागाला ‘ओंकार’ हत्तीला सुरक्षितपणे जंगलाच्या दिशेने वळविण्यात यश आले.


​या परिस्थितीवर बोलताना शिवसेना तालुकाप्रमुख नारायण राणे यांनी सांगितले की, “इन्सुली परिसरात ओंकार हत्तीच्या सततच्या वावरामुळे शेतकरी शेतीच्या कामासाठी शेतात जाण्यास घाबरत आहेत. वनविभागाने यावर तात्काळ योग्य ती खबरदारी घ्यावी आणि शेतकऱ्यांना सुरक्षा द्यावी.”


​दुसरीकडे, गेल्या काही दिवसांपासून या परिसरात हत्तीचा वावर असल्याने नागरिकांमध्ये उत्सुकता असली, तरी जंगली प्राणी दिसल्यास त्याच्याजवळ जाणे, आरडाओरडा करणे किंवा गर्दी करणे टाळावे, असे आवाहन वनविभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

शेअर करा