सणाच्या ऐन दिवशी सकाळपासून वारंवार वीज खंडित; पूजाअर्चा आणि घरगुती कामांमध्ये व्यत्यय, वीज वितरण कंपनीच्या कारभारावर नागरिकांची नाराजी.
सावंतवाडी,दि.२० ऑक्टोंबर
विजयादशमी अर्थात दसऱ्याच्या सणानिमित्त घरोघरी आनंदाचे व उत्साहाचे वातावरण असतानाच, सावंतवाडी शहरात सकाळपासूनच वारंवार वीज खंडित होण्याचा प्रकार घडला. सणाच्या ऐन दिवशीच वीज पुरवठा खंडित होत असल्याने संतप्त सावंतवाडीकरांनी वीज वितरण कंपनीच्या या सावळागोंधळा कारभाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
दसरा हा मोठा सण असल्याने घरोघरी पूजाअर्चा, नैवेद्य आणि इतर तयारीची लगबग सुरू होती. अशातच सकाळीच वीज गेल्याने नागरिकांची मोठी गैरसोय झाली. शहरात वारंवार वीज खंडित होण्याचे प्रमाण वाढल्याने वीज वितरण कंपनीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
सणाच्या दिवशी सावंतवाडी शहरासारख्या मध्यवर्ती ठिकाणी ही दयनीय स्थिती असेल, तर ग्रामीण भागात वीज वितरण कंपनीने काय ‘दिवे लावले’ असतील, असा खोचक सवाल करत ग्रामीण भागातील परिस्थितीची कल्पनाच न केलेली बरी, अशा संतप्त प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांमधून उमटत आहेत. ऐन सणासुदीच्या दिवशी तरी वीज पुरवठा सुरळीत ठेवण्याची दक्षता वीज वितरण कंपनीने घ्यायला हवी होती, अशी भावना ग्राहकांनी व्यक्त केली आहे.