सावंतवाडी : बाजारात चढणीच्या खेकड्यांची एंट्री; ग्राहकांकडून मोठी मागणी

शेअर करा

पहिल्याच दमदार पावसानंतर ग्रामीण भागातून खेकड्यांची आवक वाढली; २५० ते ३०० रुपये प्रति माळ दराने विक्री.

सावंतवाडी, दि. २४ जून
सिंधुदुर्ग जिल्ह्यात रविवारी सुरू झालेला पाऊस दमदारपणे कोसळत असून, पहिल्याच पावसात ग्रामीण भागातून चढणीचे मासे आणि खेकडे पकडण्यासाठी स्थानिक नागरिकांची लगबग सुरू झाली आहे. आज सावंतवाडी बाजारात ग्राहकांच्या पसंतीचे खेकडे विक्रीसाठी दाखल झाले होते. बाजारात या खेकड्यांना मोठी मागणी असून २५० ते ३०० रुपये प्रति माळ या दराने त्यांची विक्री झाली. यामध्ये मोठ्या खेकड्यांच्या माळेत ६ तर लहान खेकड्यांच्या माळेत १२ खेकडे होते. ग्रामीण भागातील शेतकरी रात्रीच्या वेळी हे खेकडे पकडून सकाळी विक्रीसाठी बाजारात आणत आहेत.
​दरम्यान, या दमदार पावसामुळे जिल्ह्यात शेती-बागायतीच्या कामांना वेग आला असून, शेतकरी भाताची रोपे तयार करून पुढील पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.
​बुधवारी सकाळी संपलेल्या २४ तासांत जिल्ह्यात सरासरी ६१.१२ मिमी पावसाची नोंद झाली असून, तालुकावार पाऊस (मिमी मध्ये) वैभववाडी ८५, कणकवली ८२, दोडामार्ग ७३, सावंतवाडी ६७, कुडाळ ६०, वेंगुर्ला ५१, मालवण ४४ आणि देवगड २७ मिमी. एवढा नोंद झाला आहे.

शेअर करा