सावंतवाडी : ११ केव्ही लाईनवर हेल्परला चढवलेच कसे?; महावितरणला महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचा जाब

शेअर करा

कारिवडे येथील घटनेवर अशोक सावंत यांचा संताप; कंत्राटी कर्मचाऱ्यांवर जबरदस्ती थांबवा, दोषींवर कारवाईसाठी पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधणार

सावंतवाडी,दि.०५ जुन

सावंतवाडी : ११ केव्ही विद्युत लाईनवर कंत्राटी कर्मचारी यांना चढवू नये असा नियम असताना तो का चढवला गेला ? संबंधित कर्मचारी हा हेल्पर असताना तो पोलवर का चढवलात ? असा सवाल महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचे मुख्य सल्लागार अशोक सावंत यांनी केला. सुदैवाने तो बरा असून गेल्या काही वर्षांत ९ घटना घडून काही मुलांचे मृत्यू झालेत. ही बाब दुर्दैवी असून महावितरणने कंत्राटी कर्मचाऱ्यांवर अशी जबरदस्ती करू नये असा इशारा देत संबंधितांवर कारवाई करण्यासाठी पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांचे लक्ष वेधणार असल्याचे सांगितले. येथील महावितरण कार्यालयात येत त्यांनी कारिवडे येथे झालेल्या घटनेचा अधिकाऱ्यांना जाब विचारला. यानंतर ते बोलत होते.

गोवा बांबोळी इथे उपचार घेत असलेल्या त्या कंत्राटी कर्मचाऱ्याची त्यांनी भेट घेतली. पोलवर शॉक लागून पडलेल्या प्रज्योत नाईक याला धीर दिला. यानंतर महावितरण सावंतवाडी कार्यालयात धडक देत संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरले. उप अभियंता राक्षेंसह अधिकाऱ्यांना त्यांनी जाब विचारला. पोलवर चढवल्यानंतर महावितरणची जबाबदारी असूनही एकही कर्मचारी त्याच्या सोबत गेला नाही. काल बघून आले अन् कारण सांगत असल्याने आज त्यांना जाब विचारला‌. अधिकाऱ्यांनी आपली चूक कबूल केली असून साडेपाचशे कंत्राटी कर्मचारी जिल्ह्यात चांगली सेवा देत आहेत असं मत अशोक सावंत यांनी व्यक्त केले.

दरम्यान, नारायण राणे, रवींद्र चव्हाण, नितेश राणे, निलेश राणे, दीपक केसरकर यांच्याकडून कंत्राटी कामगारांसाठी पाठपुरावा होत आहे. निलेश राणेंनी विधानभवनात हा मुद्दा मांडला. त्यानंतर आवश्यक सगळ्या साहित्याच वाटप देखील कर्मचाऱ्यांना मिळाल. नुकसान भरपाईची तरतूद देखील निलेश राणेंच्या माध्यमातून झाली. सावंतवाडीत घडलेली घटना दुर्देवी असून अशा घटना पुढे घडता नयेत. तज्ञ कर्मचारी नसतील तर कंत्राटी कर्मचाऱ्यांना पोलवर चढवू नये, त्यांच्यावर असे प्रसंग येता नयेत. आजवर झालेले प्रकार बघता संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी पालकमंत्री नितेश राणे व जिल्हाधिकारी यांच्याकडेही करणार असल्याचे श्री. सावंत यांनी सांगितले. यावेळी महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचे जिल्हाध्यक्ष संदीप बांदेकर, जिल्हा सचिव संजय गोवेकर, सर्वेश राऊळ, मोहन गावडे, बापू देसाई आदी उपस्थित होते.

शेअर करा