सावंतवाडी: पुढील चार आठवड्यांत कोकणात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता

शेअर करा

कृषी विभागाचा शेतकऱ्यांना काळजी घेण्याचा सल्ला

सावंतवाडी,दि.२७ ऑगस्ट
भारतीय हवामानशास्त्र विभाग (IMD) आणि डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली यांच्या संयुक्त विद्यमाने उद्यानविद्या महाविद्यालय, मुळदे (जि. सिंधुदुर्ग) येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा केंद्राने पुढील चार आठवड्यांसाठी विस्तारित श्रेणीतील पावसाचा अंदाज व कृषी सल्ला जारी केला आहे.
​पहिला आठवडा (२७ ऑगस्ट ते ०३ सप्टेंबर): कोकणातील सर्व जिल्ह्यांत प्रतिदिन ५ ते १० मिमी पाऊस पडण्याची शक्यता असून, हे पर्जन्यमान सरासरीपेक्षा १० ते १५ मिमीने कमी राहण्याचा अंदाज आहे.
​दुसरा आठवडा (०३ ते १० सप्टेंबर): कोकणात प्रतिदिन १० ते २० मिमी पाऊस पडू शकतो. यामध्ये पालघर (२ ते ४ मिमी जास्त), ठाणे व रायगड (४ ते ७ मिमी जास्त) तर रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांत पाऊस सरासरीइतका राहण्याची शक्यता आहे.
​शेतकऱ्यांना महत्त्वाचा कृषी सल्ला:भात पीक व्यवस्थापन: सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात भात पीक पोटरी ते लोंबी बाहेर पडण्याच्या अवस्थेत आहे. पोटरी अवस्थेत येण्यापूर्वी खाचरातील तणांची बेणणी करावी व पाण्याची पातळी ५ सेमी ठेवावी. लोंबी बाहेर पडण्याच्या १० दिवस आधी व १० दिवस नंतर खाचरात १० सेमी पाण्याची पातळी ठेवावी. पाऊस कमी पडण्याचा अंदाज असल्याने भात खाचरांची बांधबंदीस्ती करून पावसाचे पाणी साठवून ठेवावे.
खत व्यवस्थापन: वरकस जमिनीतील पिकांसाठी नत्र खताचा तिसरा हप्ता पीक फुलोऱ्यात असताना (लावणीनंतर ७० ते ८० दिवसांनी) द्यावा. रासायनिक खतांचा वापर माफक प्रमाणात करावा आणि जिथे पाण्याची उपलब्धता असेल तिथेच खते काळजीपूर्वक टाकावीत.
संरक्षित पाणी: गरज भासल्यास भात पिकाला नदी, ओढा, नाले किंवा लघुपाटबंधारे या बाह्य स्रोतातून पाणी देण्याची सोय करावी.
पाणी साठवणूक: पावसाळ्याच्या उत्तरार्धात एल निनोचा (El Niño) प्रभाव जास्त जाणवणार असल्यामुळे शेतकऱ्यांनी गट शेतीच्या माध्यमातून भात खाचरातील पाण्याची पातळी सुस्थितीत ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत.

शेअर करा