पावसाळा संपत आला तरी वेळापत्रक कोलमडलेलेच; कोकणातील प्रवाशांची गैरसोय, दुय्यम वागणूक मिळत असल्याची प्रवाशांमध्ये नाराजी
सावंतवाडी,दि.१७ ऑक्टोंबर
कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या महत्त्वाच्या एक्सप्रेस गाड्या तासनतास उशिराने धावत असल्याने कोकणातील प्रवाशांची मोठी गैरसोय होत असून, त्यांचा बहुमूल्य वेळ वाया जात आहे. पावसाळा संपत आला असला आणि सध्या कोणतीही पावसाळी परिस्थिती नसली, तरीही गाड्यांचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडल्याचे चित्र आहे. कोकणातील प्रवाशांना जाणीवपूर्वक दुय्यम स्थान दिले जात असल्याचा संताप प्रवाशांमधून व्यक्त होत आहे.
गाड्यांचे वेळापत्रक विस्कळीत:
कोकण रेल्वे मार्गावरील अतिशय लोकप्रिय आणि महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या कोकणकन्या एक्सप्रेस, मांडवी एक्सप्रेस, जनशताब्दी एक्सप्रेस, तुतारी एक्सप्रेस आणि दिवा-सावंतवाडी पॅसेंजर या गाड्या वेळेवर धावत नसल्याच्या तीव्र तक्रारी प्रवाशांकडून येत आहेत. कोणत्याही मोठ्या कारणविना किंवा पावसामुळे नैसर्गिक अडथळा नसतानाही या गाड्या नियमितपणे दोन ते चार तास उशिराने धावत आहेत.
सणासुदीचा काळ नसतानाही ,कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची आणि प्रवाशांची मोठी गर्दी होते.नियमित गाड्यांचे वेळापत्रक कोलमडलेले असल्याने प्रवाशांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.
कोकण रेल्वे प्रशासनाच्या या ढिसाळ कारभाराबद्दल कोकणातील प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. वारंवार घडणाऱ्या या प्रकारामुळे प्रवाशांच्या वेळेचा अपव्यय होत असून विद्यार्थ्यांपासून चाकरमान्यांपर्यंत सर्वांनाच नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे कोकण रेल्वे मार्गावरील या अनागोंदी कारभाराची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, अशी जोरदार मागणी संतप्त प्रवाशांमधून केली जात आहे.