सावंतवाडी,दि.१६ जून
सावंतवाडी तालुक्याच्या प्रसिद्ध युवा कवयित्री व लेखिका स्वप्ना गोवेकर लिखित पाठाचा समावेश इयत्ता ६ वीच्या पाठ्यपुस्तकात करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे (बालभारती) यांच्या वतीने विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी या पाठाची निवड करण्यात आली आहे.
इयत्ता सहावीच्या ‘बालभारती’ मराठीच्या पाठ्यपुस्तकात हा पाठ समाविष्ट करण्यात आला असून, ‘राष्ट्रध्वज माझा अभिमान’ असे या पाठाचे शीर्षक आहे. विद्यार्थी, शिक्षक व पालक यांनी आत्मसात करण्याजोगी मूल्ये या पाठात असल्या कारणाने, तज्ज्ञ समितीकडून या पाठाची निवड करण्यात आली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षापासून येत्या पुढे ६ वर्षांसाठी हा अभ्यासक्रम असणार आहे. बदललेल्या अभ्यासक्रमाची ही नवीन पाठ्यपुस्तके आता महाराष्ट्रातील सर्व शाळांमधून उपलब्ध होणार आहेत. लेखिका स्वप्ना गोवेकर यांचा सन २०१९ मध्ये ‘आठवणी आजोळच्या’ हा कथासंग्रह तर २०२३ मध्ये ‘काव्यरंग’ हा कवितासंग्रह प्रकाशित झाला आहे. त्यांच्या ‘काव्यरंग’ संग्रहाला कोकण मराठी साहित्य परिषदेचा (कोमसाप) वाङ्मयीन पुरस्कार देखील मिळालेला आहे.
स्वप्ना गोवेकर लिखित पाठाच्या या निवडीबद्दल महाराष्ट्र मराठी अध्यापक संघाच्या शिक्षकांनी, तसेच सिंधुदुर्ग पतंजली योग समितीच्या पदाधिकाऱ्यांनी लेखिकेचे विशेष अभिनंदन केले आहे. त्यांच्या या यशामुळे सावंतवाडी तालुक्यासह संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातून कौतुक होत आहे.