सावंतवाडी : लेफ्ट.कर्नल श्रीमंत शिवरामराजेंचे विचार प्रेरणादायी

शेअर करा

मुंबई विद्यापीठ कुलगुरू डॉ.रवींद्र कुलकर्णींचे प्रतिपादन

सावंतवाडी,दि.१३ ऑगस्ट

लेफ्ट.कर्नल हिज हायनेस श्रीमंत शिवरामराजे भोंसले यांचे चरित्र आपण वाचले आहे, ते अत्यंत प्रेरणादायी आहे. त्यांचे विद्यार्थ्यांनी वाचन करावे.
त्यांचा एकतरी विचार आत्मसात करण्याचा प्रयत्न करावा. राजेसाहेब हे विद्वान व अष्टपैलू होते असे उद्गार मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी यांनी काढले. श्री पंचम खेमराज महाविद्यालयात शिवराम राजेंच्या जन्मशताब्दी वर्ष प्रारंभा निमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी (स्वायत्त) मध्ये हिज हायनेस लेफ्ट. कर्नल श्रीमंत शिवरामराजे भोंसले यांची 99 वी जयंती ‘संस्थापक दिन’ म्हणून साजरी करण्यात आली.
शिवरामराजेंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. तसेच नवीन बांधलेला इमारतीला लेफ्टनंट कर्नल हिज हायनेस श्रीमंत शिवरामराजे भोंसले इमारत यांचे नाव देऊन त्या फलकाचे मान्यवरांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. शिवरामराजे भोंसले यांचे 2027 हे जन्मशताब्दी वर्ष असुन यानिमित्ताने बोधचिन्हाचे अनावरण प्रमुख अतिथींच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी कुलगुरू डॉ. कुलकर्णी पुढे म्हणाले, आज पासून 60- 70 वर्षांपूर्वी कोकणासारख्या दुर्गम भागामध्ये शिक्षण व्यवस्था सुरू करून त्यांनी उच्च शिक्षणाचे दरवाजे सर्वसामान्यांसाठी उघडे केले. हस्तकला व लोककला यांना राजाश्रय दिल्याचे डॉ. कुलकर्णी यांनी सांगितले. तर राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून नवीन शैक्षणिक पद्धतीमध्ये विद्यार्थ्यांची कौशल्य विकसित करणे हा बदललेल्या शिक्षण पद्धतीचा मुख्य उद्देश आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता याचा वापर करायला हवा. परंतु, हे ए आय चे गुलाम होऊ नका असे ते म्हणाले. जागतिक वातावरण बदलाच्या अनुषंघाने ग्रीन एनर्जीचा वापर वाढवायला हवा, जीवाश्म इंधनांचा वापर जपून करायला हवा. जेव्हा एखादी नवीन टेक्नॉलॉजी येते तेव्हा ती जुने प्रश्न सोडविताना नवीन प्रश्न निर्माण करते,यासाठी बुद्धिमत्तेच्या माध्यमातून नवीन प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करत रहायला हवे. आपला स्क्रीन टाईम कमी करा असेही ते म्हणाले.

अध्यक्षीय भाषणात राजेसाहेब खेमसावंत भोंसले म्हणाले, राजेसाहेबांनी 1960 -61 च्या दरम्यान हे कॉलेज सुरू केले. त्या काळामध्ये दळणवळणाची साधने अपुरी असल्यामुळे राजवाड्यामध्येच विद्यार्थ्यांसाठी वस्तीगृह सुरू केले आणि गरीब मुलांच्या शिक्षणाची सोय केली. त्यामुळे या भागातील मुले शिकली. आजही संस्था विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करीत आहे. विद्यार्थ्यांनी प्रचंड मेहनत करून स्वयंशिस्तीने ज्ञान मिळवावे व यशस्वी व्हावे असे त्यांनी आवाहन केले. यावेळी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी, संस्थेच्या चेअरमन राणीसाहेब सौ.शुभदादेवी भोंसले, संस्थेचे कार्यकारी विश्वस्त व मुंबई विद्यापीठाचे सिनेट सदस्य युवराज लखमराजे भोंसले, संस्थेच्या विश्वस्त व सावंतवाडी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा युवराज्ञी सौ. श्रद्धाराजे भोंसले, संस्थेचे कार्यकारीणी सदस्य जयप्रकाश सावंत, डॉ. सतीश सावंत,संस्थेचे संचालक प्रा.डी टी देसाई, सहाय्यक संचालक अॅड.शामराव सावंत, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी एल भारमल, सामाजिक कार्यकर्ते अण्णा केसरकर, ॲड. नकुल पार्सेकर, माजी डीवायएसपी दयानंद गवस, सुमन गावडे, प्रा.सुभाष गोवेकर, प्रा. अन्वर खान, लॉ कॉलेजच्या प्राचार्य डॉ. अश्विनी लेले, मदर क्वीन्स इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ अनुजा साळगावकर, सुभाष देसाई, प्रेमानंद कुडदेसाई, ए.के. देसाई कोलझर,पी पी देसाई, काका मांजरेकर,प्रा.जी.एम शिरोडकर तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ डी एल भारमल यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. सौ पुनम सावंत तर आभार प्रा. डॉ. बी. एन हिरामणी यांनी मानले.

शेअर करा