माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या शिष्टमंडळाची पोलीस निरीक्षकांकडे मागणी; अत्यावश्यक सेवांच्या वाहनांना अडथळा होऊ नये यासाठी विशेष बंदोबस्ताची विनंती
सावंतवाडी , दि.१२ ऑगस्ट
वर्षा पर्यटनासाठी आंबोली येथे शनिवार आणि रविवारी होणारी पर्यटकांची प्रचंड गर्दी आणि त्यामुळे उद्भवणारी वाहतूक कोंडी लक्षात घेता, धबधब्याच्या परिसरातील किमान ५ किलोमीटरचा रस्ता वाहतूक कोंडीविरहीत ठेवण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत, अशी मागणी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्याकडे केली आहे. अत्यावश्यक सेवेतील वाहनांना अडथळा होऊ नये, यासाठी ही उपाययोजना आखण्याची विनंती पोलीस ठाण्यात झालेल्या बैठकीत करण्यात आली.
रस्त्यावरून जाणाऱ्या रुग्णांची अडचण आणि अपघात:
पर्यटक आपली वाहने रस्त्याच्या दुतर्फा अस्ताव्यस्त पार्क करतात. त्यामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या गंभीर रुग्णांच्या रुग्णवाहिकांना मोठा फटका बसतो. दोन दिवसांपूर्वी धबधब्याच्या ठिकाणी सर्पदंश झालेल्या एका पर्यटकाचा वाहतूक कोंडीमुळे वेळेवर उपचार न मिळाल्याने मृत्यू झाल्याचा मुद्दा साळगावकर यांनी मांडला.
यावर स्पष्टीकरण देताना पोलीस निरीक्षक मगदूम यांनी सांगितले की, पर्यटकाचा मृत्यू वाहतूक कोंडीमुळे झालेला नाही. रुग्णवाहिकेला कुठलाही अडथळा निर्माण झाला नव्हता.
पोलीस प्रशासनासमोरील आव्हाने व कर्मचाऱ्यांची कमतरता:
पर्यटकांच्या बेधुंद वर्तनावर बोलताना मगदूम म्हणाले की, अतिउत्साही व मद्यधुंद पर्यटकांना आवर घालणे कठीण जाते. पोलिसांनी कारवाईचा प्रयत्न केल्यास चुकीच्या पद्धतीने व्हिडिओ शूटिंग करून पोलिसांची बदनामी केली जाते.
तसेच सावंतवाडी पोलीस ठाण्यात कर्मचाऱ्यांची प्रचंड कमतरता आहे. मंजूर ९७ पदांपैकी केवळ ६० कर्मचारी कार्यरत असून ३० पेक्षा जास्त पदे रिक्त आहेत. पूर्वी वर्षा पर्यटनासाठी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून १०० अतिरिक्त पोलिसांचे बळ मिळायचे, मात्र सध्या अपुऱ्या कर्मचाऱ्यांवरच सुरक्षेचा भार आहे. किमान २० अतिरिक्त कर्मचारी मिळावेत, अशी मागणी वरिष्ठ पोलीस अधीक्षकांकडे केल्याचे त्यांनी सांगितले.
उपाययोजना व सूचना:
अवजड वाहनांवर बंदी: शनिवार-रविवारी वाहतुकीला अडथळा ठरणारी अवजड वाहने रोखण्यात यावीत, असे साळगावकर यांनी सुचवले. ग्रामपंचायतीला विश्वासात घेऊन पार्किंगचे नियोजन करावे. मात्र, ग्रामपंचायतीकडून सहकार्य मिळत नसल्याची व वनविभागाचे कर्मचारी केवळ धबधब्यापुरतेच मर्यादित राहतात, अशी खंत मगदूम यांनी व्यक्त केली. मुख्य धबधब्याव्यतिरिक्त लहान धबधब्यांजवळ रस्त्यावर वाहने लावून नाचणे, रिल्स बनवणे व स्टंटबाजी करणे थांबवले पाहिजे, अशी मागणी ज्येष्ठ पत्रकार सिताराम गावडे यांनी केली.
सावंतवाडी शहरातील वाहतूक कोंडी
सावंतवाडी शहरातील वाहतूक कोंडीबाबतही लक्ष वेधण्यात आले. यावर नगरपालिका प्रशासनाकडून नवीन नियमावली तयार केली जात असून, ती पूर्ण होताच शहरात वाहतूक नियंत्रण अंमलात आणले जाईल, असे पोलीस निरीक्षकांनी स्पष्ट केले.
या प्रसंगी बबन साळगावकर, सिताराम गावडे, विलास जाधव, अभय पंडित, बावतीस फर्नांडिस, संदीप नाईक, सुंदर गावडे, शिवा गावडे, संतोष तळवणेकर, गौरव जाधव आणि डुमिंग आल्मेडा आदी उपस्थित होते.