सावंतवाडी : पिग्मी एजंटांच्या कमिशन दराबाबत सहकार आयुक्तांसोबत बैठक; लवकरच सन्मानजनक तोडगा काढण्याचे आश्वासन

शेअर करा

सावंतवाडी, दि. १५ जून
महाराष्ट्र शासनाने पिग्मी एजंटांसाठी आदर्श उपविधीमध्ये कमिशनचा दर २.५ टक्के निश्चित केल्यामुळे राज्यभरातील एजंटांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले होते. हा दर पूर्वीप्रमाणे ३ टक्के करावा, अशी मागणी विविध पतसंस्था फेडरेशनच्या माध्यमातून सहकार आयुक्तांकडे सातत्याने केली जात होती. या पार्श्वभूमीवर, सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था (महाराष्ट्र राज्य) श्री. दिपक तावरे यांनी पुणे येथे राज्यातील सर्व पतसंस्था फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांची नुकतीच (दि. १२) विशेष बैठक घेतली. या बैठकीला आपण स्वतः उपस्थित असल्याची माहिती सिंधुदुर्ग जिल्हा पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष श्री. सुनील राऊळ यांनी दिली.


​पुणे येथील बैठकीला विदर्भ, कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि मुंबई अशा विविध विभागांतून पतसंस्था फेडरेशनचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सहकार आयुक्त श्री. दिपक तावरे यांनी सर्व जिल्हा अध्यक्षांना याविषयी बाजू मांडण्याची संधी दिली. पिग्मी एजंट हे स्वतःच्या खर्चाने दूरवर फिरून संस्थेसाठी ठेवी गोळा करतात आणि जनतेला बचतीची सवय लावतात. त्यामुळे या महागाईच्या काळात त्यांच्या कुटुंबाचा चरितार्थ चालवण्यासाठी ३ टक्के कमिशन दर कायम ठेवण्यात यावा, अशी विनंती सर्व जिल्हा अध्यक्षांनी बैठकीत केली. जवळपास अडीच तास चाललेल्या या बैठकीत सहकार आयुक्तांनी फेडरेशनची भूमिका समजून घेत लवकरच सन्मानजनक तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.


​या बैठकीत एकूणच पतसंस्था चळवळीच्या सक्षमीकरणावरही चर्चा झाली. पतसंस्थांची चळवळ सुदृढ करणे व तिचे सक्षमीकरण करण्यावर शासनाचा भर असल्याचे आयुक्त श्री. तावरे यांनी सांगितले. राज्यातील पतसंस्थांच्या कामकाजात एकसूत्रीपणा येणे ही काळाची गरज असून, सभासदांच्या व ठेवीदारांच्या हिताचे रक्षण करणे ही शासनाची प्रथम स्तरावरील भूमिका राहील, असे त्यांनी स्पष्ट केले. सध्या संस्था स्तरावर पिग्मी ठेवींबाबत वेगवेगळी नियमावली कार्यरत असल्याने, शासनाने संपूर्ण महाराष्ट्रातील पिग्मी ठेवधारकांसाठी एकसारखी नियमावली लागू करावी, अशी मागणी फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांनी केली.
​अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडलेल्या या बैठकीनंतर पिग्मी एजंटांचा हा ज्वलंत प्रश्न लवकरच सुटेल, असा आशावाद सिंधुदुर्ग जिल्हा पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष श्री. सुनील राऊळ यांनी व्यक्त केला. तसेच सहकार खात्याच्या सकारात्मक भूमिकेबद्दल त्यांनी आभार मानले.

शेअर करा