सावंतवाडी, दि. ४ जून
शहरातील विस्कळीत वीज पुरवठ्याच्या पार्श्वभूमीवर शुक्रवार, दिनांक ५ जून रोजी दुपारी १२ वाजता काझी शहाबुद्दीन हॉल येथे एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी दिली आहे. या बैठकीला आमदार प्रमोद जठार प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. याशिवाय वीज वितरण कंपनीचे वरिष्ठ अधिकारी श्री. वनमोरे यांच्यासह सावंतवाडी अर्बनचे सर्व इंजिनियर्सही या बैठकीस उपस्थित राहणार आहेत.
मे महिन्यातील रखरखत्या उन्हामध्ये शहरात वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने नागरिक कमालीचे हैराण झाले आहेत. यासंदर्भात संबंधित विभागाकडे अनेक तक्रारी करूनही त्याची कोणतीही दखल घेतली गेलेली नाही. त्यामुळे शहरातील विद्युत पुरवठा सुरळीत व्हावा, या दृष्टीने आमदार प्रमोद जठार यांनी वीज वितरणच्या अधिकाऱ्यांसोबत या बैठकीचे आयोजन केले आहे.
या बैठकीस सावंतवाडी शहरातील सर्व लोकप्रतिनिधी, नगरसेवक, विविध संस्था, व्यापारी संघटना तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या समस्या मांडाव्यात, असे आवाहन भाजपचे शहराध्यक्ष, क्रिडा सभापती सुधीर आरीवडेकर, नियोजन सभापती आनंद नेवगी आणि माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी केले आहे.