सावंतवाडी,दि.१० जून
सावंतवाडी रेल्वे स्थानकाचे नामकरण ‘लोकमान्य मधू दंडवते रेल्वे टर्मिनस’ असे करण्याचा ऐतिहासिक निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयाबद्दल सावंतवाडी विधानसभा मतदार संघाचे आमदार दीपक केसरकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भेट घेऊन प्रत्यक्ष आणि पत्राद्वारे मनःपूर्वक आभार मानले आहेत.
आमदार दीपक केसरकर यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, कोकण रेल्वेचे शिल्पकार आणि ज्येष्ठ समाजवादी नेते कै. मधू दंडवते यांचे नाव सावंतवाडी रेल्वे स्थानकाला देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेऊन कोकणवासीयांच्या भावनांचा आदर केला आहे. या निर्णयामुळे सावंतवाडी विधानसभा मतदार संघातील जनतेमध्ये आणि संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात अत्यंत समाधान व आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
कोकणच्या विकासातील योगदानाचा गौरव
कोकणच्या आणि पर्यायाने रेल्वेच्या विकासात कै. मधू दंडवते यांचे योगदान अत्यंत मोलाचे राहिले आहे. त्यांच्या या भरीव कार्याचा गौरव करणारा हा निर्णय असून, अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली जनतेची ही मागणी सरकारने सकारात्मकतेने मान्य करून न्याय दिला आहे, अशी भावना केसरकर यांनी व्यक्त केली.
मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र शासन जनभावनांचा आदर राखून सातत्याने विकासाभिमुख निर्णय घेत असल्याचा सार्थ अभिमान वाटतो, असे नमूद करत भविष्यातही कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाचे असेच सहकार्य लाभत राहील, अशी अपेक्षाही आमदार केसरकर यांनी या पत्रात व्यक्त केली आहे.