यंदा ‘मिरग’ कोरडा जाण्याची शक्यता; कोकणात १० ते ११ जूनदरम्यान मान्सून आगमनाचा अंदाज.**
सावंतवाडी, दि. ४ जून
दीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर नैऋत्य मान्सूनचे आज, ४ जून रोजी केरळमध्ये आगमन झाल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे. नेहमीच्या १ जून या ठरलेल्या वेळेपेक्षा यंदा मान्सून चार दिवस उशिराने दाखल झाला आहे. दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्ह्यातही गेल्या दोन दिवसांत काही ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. बुधवारी आणि गुरुवारी झालेला हा पाऊस सर्वदूर नसला, तरी तुरळक ठिकाणी त्याने हजेरी लावली आहे.
मान्सून केरळमध्ये उशिराने दाखल झाल्यामुळे यंदाचा ‘मिरग’ कोरडाच जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, येत्या १० व ११ जून रोजी मान्सून कोकणात दाखल होऊ शकतो.
तरवा पेरणी लांबणीवर; शेतकरी चिंतेत:
मिरग कोरडा जाण्याच्या शक्यतेमुळे जिल्ह्यातील भात शेतीची तरवा पेरणी काहीशी लांबणीवर पडली आहे. असे असले तरी शेतकऱ्यांनी शेतीच्या मशागतीची कामे वेगाने सुरू केली आहेत. ज्या भागात पाणथळ जमीन आहे किंवा जेथे पाण्याची उपलब्धता आहे, अशा ठिकाणी शेतकरी पाण्याचा उपसा करून तरवा पेरणी करत आहेत. पावसाअभावी वेळ वाया जाऊ नये म्हणून भाताची रोपे तयार करण्यासाठी सध्या बळीराजाची चांगलीच लगबग सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे.