सावंतवाडी : कारिवडेत विद्युत खांबावर काम करताना महावितरण कर्मचाऱ्याला विजेचा धक्का

शेअर करा

दहा फूट उंचीवरून जमिनीवर कोसळून कंत्राटी कर्मचारी जखमी; प्राथमिक उपचारानंतर गोवा बांबोळी येथे हलविले

सावंतवाडी
तालुक्यातील कारिवडे येथे एका विद्युत खांबावर दुरुस्तीचे काम करत असताना महावितरणच्या कंत्राटी कर्मचाऱ्याला विजेचा तीव्र धक्का लागल्याची घटना घडली आहे. विजेचा धक्का बसताच हा कर्मचारी दहा फुटावरुन थेट जमिनीवर कोसळला. प्रज्योत नाईक रा. आरोस असे या जखमी कर्मचाऱ्याचे नाव आहे. त्याच्यावर येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये प्राथमिक उपचार करून अधिक उपचाराकरता गोवा बांबोळी येथे हलविण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रज्योत नाईक हे महावितरणचे कंत्राटी कर्मचारी आहेत, त्याच्याजवळ कुणकेरी आंबेगाव या दोन गावाची जबाबदारी आहे. ते व अन्य महावितरणचे कर्मचारी मिळून कारिवडे गावात काम करत होते. यावेळी विद्युत खांबावर काम सुरू असतानाच अचानक त्यांना विजेचा जोरदार धक्का लागला आणि नियंत्रण सुटल्याने ते खांबावरून खाली जमिनीवर कोसळले. हा प्रकार पाहताच परिसरातील स्थानिक ग्रामस्थ आणि त्यांच्यासोबत असलेल्या अन्य विद्युत कर्मचाऱ्यांनी कोणतीही वेळ न दवडता प्रज्योत नाईक यांना तात्काळ सावंतवाडी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयातील डॉक्टर आणि परिचारिका यांनी तातडीने त्यांची वैद्यकीय तपासणी करून आवश्यक ते उपचार सुरू केले. सुदैवाने प्रज्योत यांच्यावर कोणताही गंभीर प्रसंग ओढवला नसून त्यांची प्रकृती आता धोक्याबाहेर आहे. मात्र हाताला विजेचा धक्का बसल्याने त्याला अधिक उपचारा करतात गोवा बांबोळी येथे हलविण्यात आले आहे.
​ या घटनेची माहिती मिळताच महावितरणच्या अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी उपजिल्हा रुग्णालयात धाव घेऊन प्रज्योत नाईक यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. तसेच ‘जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठान’चे अध्यक्ष राजू मसूरकर यांनीही रुग्णालयाला भेट दिली. त्यांनी प्रज्योत यांच्या तब्येतीची आस्थेने चौकशी करत धीर दिला., घडलेल्या या घटनेमुळे वीज कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. माडखोल येथे अशाच प्रकारे वर्ष भरापुर्वी खासगी ठेकेदाराकडे काम करणार्या युवकाला विजेचा धक्का बसून त्याचे निधन झाले होते. एचुणच पावसाळ्यात वीजेच्या समस्या लक्षात घेता कर्मचार्याच्या सुरक्षेतेच्या दृष्टीने उपाययोजना राबवा अशी मागणीही यानिमित्ताने होत आहे.

शेअर करा