Sawantwadi : सावंतवाडी पाणीपुरवठा योजनेचे थांबलेले काम पुन्हा सुरू

शेअर करा

२६ जानेवारी २०२७ पर्यंत काम पूर्ण करण्याचा पालिकेचा निर्धार

​सावंतवाडी,दि.२३ ऑक्टोंबर
सावंतवाडी शहरासाठी ‘महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान’ अंतर्गत मंजूर असलेल्या ५६ कोटी रुपयांच्या नळ पाणीपुरवठा योजनेचे थांबलेले काम आता पुन्हा वेगाने सुरू होणार आहे. या योजनेबाबत प्राप्त झालेला ‘थर्ड पार्टी ऑडिट रिपोर्ट’ (त्रयस्थ तांत्रिक लेखापरीक्षण अहवाल) पालिकेच्या विशेष सर्वसाधारण सभेत सादर करण्यात आला असून, पुणे येथील ‘सीओईपी’ (COEP) तंत्रज्ञान विद्यापीठाकडून या कामाचा दर्जा समाधानकारक असल्याचा अहवाल देण्यात आला आहे. त्या धर्तीवर येत्या २६ जानेवारी २०२७ पर्यंत ही योजना पूर्ण करून सावंतवाडीकरांना मुबलक पाणीपुरवठा करण्याचा निर्धार नगराध्यक्षा सौ. श्रद्धा लखम सावंत-भोसले यांनी व्यक्त केला आहे.
​नगराध्यक्षा सौ. श्रद्धा सावंत-भोसले यांच्या अध्यक्षतेखाली सावंतवाडी नगरपरिषदेची विशेष बैठक पार पडली. मुख्याधिकारी विनायक औंधकर यांच्यासह सत्ताधारी व विरोधी पक्षाचे नगरसेवक उपस्थित होते.
या योजनेच्या कामात तांत्रिक दोष असल्याच्या तक्रारी नगरसेवक व नागरिकांनी केल्यामुळे काम थांबले होते. त्यानंतर COEP विद्यापीठाच्या स्थापत्य अभियांत्रिकी विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. नामदेव हेडाऊ यांच्यामार्फत त्रयस्थ लेखापरीक्षण करण्यात आले. मात्र, बैठकीदरम्यान अहवाल सादर करणारे प्राध्यापक निवडणुकीच्या कामामुळे अनुपस्थित राहिल्याने भाजप नगरसेवक ॲड. सिद्धार्थ भांबुरे यांनी जोरदार आक्षेप नोंदवला. अहवालातील काही पाने गहाळ असल्याचा आरोप करत प्रश्नांची उत्तरे कोणाकडून मिळणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. यावर शिवसेना नगरसेवक बाबू कुडतरकर, ॲड. सायली दुभाषी , सुधीर आडीवरेकर,देव्या सूर्याजी यांनीही प्रशासनाला धारेवर धरले. तर नगरसेवक देवेंद्र टेमकर आणि तौकीर शेख यांनी बैठकीत राजकीय वाद न घालता लोकांच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यासाठी तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली.
​माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक संजू परब यांनी, “थर्ड पार्टी ऑडिट पूर्ण झाले असून अहवाल समाधानकारक आहे. आता जास्त चर्चा न करता ठेकेदाराकडून गुणवत्तापूर्ण काम करून घेणे व नागरिकांना वेळेत पाणी पुरवणे ही पालिकेची व मुख्याधिकाऱ्यांची जबाबदारी आहे,” असे स्पष्ट केले.
​६ टीम्सच्या माध्यमातून काम वेगाने पूर्ण करणार : मुख्याधिकारी
मुख्याधिकारी विनायक औंधकर यांनी बैठकीत माहिती देताना सांगितले की, आतापर्यंत २७ कोटी रुपयांचे बिल अदा करण्यात आले असून उर्वरित सुमारे ५२ टक्के काम पूर्ण करण्यासाठी ६ विशेष टीम्स तैनात करण्यात आल्या आहेत. यात इंजिनिअर्स, सुपरवायझर्स आणि प्लंबर्सचा समावेश असेल. शहरात ३०० मीटरची मुख्य लाईन टाकणे बाकी असून, पाणीपुरवठा सुरळीत होऊन लोकांपर्यंत पाणी पोहोचेपर्यंतची संपूर्ण जबाबदारी ठेकेदार कंपनीची असणार आहे.
या योजनेच्या खुदाईमुळे शहरात ठिकठिकाणी खड्डे पडले असून रस्ते खराब झाले आहेत. यामुळे नागरिकांचे अपघात होत असल्याचे नगरसेविका वीणा जाधव, अजय गोंदावळे, नीलम नाईक, आनंद नेवगी आणि सुधीर आरवडेकर यांनी निदर्शनास आणून दिले. त्यावर नगराध्यक्षांनी स्पष्ट केले की, तात्पुरत्या कोल्ड मिक्सने भरलेल्या रस्त्यांचे काम आता हॉट मिक्स पद्धतीने करून सर्व रस्ते पूर्ववत व खड्डेमुक्त केले जातील.
नगराध्यक्षा सौ. श्रद्धा सावंत-भोसले यांनी सांगिते की, पाळणेकोंड धरण योजनेतून मिळणाऱ्या पाण्यासोबतच दुष्काळी परिस्थितीत पाळणेकोंड, केसरी चिवारटेकडी आणि नरेंद्र डोंगर पाणी पुरवठा योजनेतून पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्याचे नियोजन आहे. २६ जानेवारी २०२७ पूर्वी योजना पूर्ण करून सावंतवाडी शहराला कायमस्वरूपी मुबलक व स्वच्छ पाणीपुरवठा केला जाईल.

शेअर करा