सावंतवाडी,दि.२२ जून
राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान अंतर्गत नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या विशेष अभ्यास दौरा व क्षमता बांधणी प्रशिक्षणासाठी सावंतवाडी पंचायत समितीचे लोकप्रतिनिधी सज्ज झाले आहेत. सावंतवाडी पंचायत समितीच्या सभापती सुष्मिता जाधव आणि उपसभापती गौरव मुळीक यांच्यासह एकूण १३ सदस्य पुणे येथील ‘यशदा’ (यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधनी) येथे प्रशिक्षणासाठी अधिकृतपणे रुजू झाले आहेत.
२२ ते २४ जून दरम्यान प्रशिक्षण वर्ग
’यशदा’ प्रशासनाने जाहीर केलेल्या अधिकृत पत्रानुसार प्रशिक्षण २२ जून ते २४ जून, २०२६ या कालावधीत पार पडत आहे. पंचायत राज संस्थांमधील लोकप्रतिनिधींची क्षमता वाढवणे आणि त्यांना प्रशासकीय कामकाजाची सखोल माहिती देणे हा या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश आहे.
मिळालेल्या माहितीनुसार आणि पत्रातील सूचनांनुसार, हे प्रशिक्षण पूर्णपणे निवासी स्वरूपाचे आहे.
सावंतवाडी तालुक्यातील ग्रामीण भागाचा विकास अधिक प्रभावीपणे व शासकीय नियमांच्या चौकटीत राहून कसा करता येईल, याचे धडे या ३ दिवसांत सदस्यांना मिळणार आहेत. सभापती सुष्मिता जाधव आणि उपसभापती गौरव मुळीक यांच्या नेतृत्वाखाली सर्व १३ सदस्य या प्रशिक्षणात सहभागी झाल्याने, आगामी काळात सावंतवाडी पंचायत समितीच्या माध्यमातून विकासकामांना मोठी गती मिळेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.