सावंतवाडी ,दि.१८ जून
सावंतवाडी शहरातील सालईवाडा येथे बेकायदेशीरपणे कल्याण नावाचा मटका जुगार चालवणाऱ्या अड्ड्यावर पोलिसांनी गुरुवारी दुपारी एकच्या सुमारास छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी १८ हजार ३०० रुपयांची रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य जप्त केले असून, याप्रकरणी तीन जणांविरुद्ध सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी शंभू वीरनोडकर रा. सावंतवाडी, अमित जाधव रा. ओटवणे, आणि दत्तप्रसाद शेळके रा. सावंतवाडी अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित शंभू वीरनोडकर याच्या सांगण्यावरून अमित जाधव आणि दत्तप्रसाद शेळके हे दोघे सायकल मार्टच्या पाठीमागे जाहीर ठिकाणी लोकांकडून पैसे स्वीकारून ‘कल्याण’ नावाचा मटका जुगार खेळवत होते. या प्रकरणाची गोपनीय माहिती मिळताच पोलिसांच्या पथकाने या ठिकाणी अचानक छापा टाकला. या कारवाईदरम्यान पोलिसांनी १८ हजार ३०० रुपयांची रोख रक्कम आणि मटका जुगाराचे साहित्य रंगेहात जप्त केले.
ही धडक कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे (एलसीबी) पोलीस उपनिरीक्षक सुधीर सावंत व प्रकाश कदम, तसेच सावंतवाडी पोलीस ठाण्याचे महेश जाधव आणि अनिल दवे यांच्या संयुक्त पथकाने केली आहे. याप्रकरणी सावंतवाडी पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला असून, पोलीस पुढील तपास करत आहेत, असे पोलिस ठाणे अंमलदार यांनी सांगितले.