सावंतवाडी : वृत्ताची दखल; झिरंगवाडीतील स्मिता परब यांची पाणीपुरवठ्याची समस्या अखेर मार्गी

शेअर करा

नगरपरिषदेकडे वारंवार पाठपुरावा करूनही मिळत नव्हते पाणी; वृत्त प्रसारित होताच प्रशासनाची हालचाल, समस्या दूर

सावंतवाडी, दि.०८ जून

नगरपरिषदेकडून पाणी पुरवठा योजनेचे नळ कनेक्शन मिळण्यासाठी हजारो रुपये खर्च करूनही अद्याप पाण्याचा एक थेंबही मिळत नसल्याने, झिरंगवाडी म्हाडा कॉलनी येथील महिला ग्राहक स्मिता परब यांनी तीव्र संताप व्यक्त केला होता. नगराध्यक्षा सौ. श्रद्धा सावंत-भोसले, माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्यासह नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांच्या अनेकदा भेटी घेतल्यावरही प्रशासनाच्या उदासीनतेमुळे त्यांना पाणी मिळालेले नव्हते. पाणी पुरवठा सभापती प्रतीक बांदेकर यांचे लक्ष वेधण्यात आले होते. याचे वृत्त प्रसारित झाल्यानंतर आज त्यांची समस्या दुर झाली आहे.

सावंतवाडी झिरंगवाडी म्हाडा कॉलनी येथील स्मिता परब यांच्या घरातील पाणी कनेक्शन बंद असल्याने ते पुन्हा सुरू व्हावे, यासाठी त्या मार्च महिन्यापासून सातत्याने प्रयत्न करत होत्या. नगरपरिषदेचे कर्मचारी अशोक मुरगुड यांनी पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी सुमारे १५ हजार रुपयांचा खर्च सांगितला होता. त्यानंतर परब यांनी स्वतः कामगार लावून नळपाणी लाईनसाठी खोदकाम करून घेतले.
या नळपाणी पुरवठा योजनेसाठी त्यांनी नगरपरिषदेत अनधिकृतरीत्या ३ हजार ५०० रुपये भरले. कामगार खर्च, साहित्य आणि खोदकामासह नळ कनेक्शन जोडेपर्यंत त्यांनी आतापर्यंत एकूण १८ हजार रुपये खर्च केले. एवढा मोठा आर्थिक भुर्दंड सहन करून आणि लोकप्रतिनिधींकडे उंबरठे झिजवून अखेर नळ कनेक्शन जोडण्यात आले खरे, मात्र तरीही नळाला पाणी आलेले नव्हते. सध्या पाणी घरात मिळत नसल्याने त्यांना हाॅटेल मध्ये राहण्याची वेळ आली होती. याबाबतचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर तात्काळ कार्यवाही करण्यात आली आहे. त्यांची समस्या दुर झाली असून त्यांची जुनी लाईन मिळत नव्हती, ती मिळाली असून त्या लाईनवर पाणी चालू केले आहे अशी माहिती देण्यात आली आहे. याबाबत नगरसेवक देव्या सुर्याजी, माजी नगरसेवक विलास जाधव यांनी देखील विशेष प्रयत्न केले होते.

शेअर करा