१२ जून रोजी होणार आरक्षण सोडत
सावंतवाडी,दि.०४ जुन
सावंतवाडी तालुक्यातील मुदत संपलेल्या आणि नव्याने निर्माण झालेल्या ११ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आरक्षण सोडतीचा अधिकृत कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार येत्या १२ जून रोजी संबंधित ग्रामपंचायतींमध्ये आरक्षणाची सोडत काढली जाणार आहे. निवडणूक प्रक्रिया वेळेत पार पाडण्याच्या दृष्टीने प्रशासकीय पातळीवर वेग आला असून, या प्रक्रियेत कोणताही विलंब टाळण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
या संदर्भात तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी कार्यालय, सावंतवाडी आणि पंचायत समिती सावंतवाडी यांच्यातर्फे अधिकृत पत्रके जारी करण्यात आली आहेत.
यामध्ये तालुक्यातील आरोंदा, आरोस, आंबोली, इन्सुली, डिंगणे, तळवडे, चौकुळ, मळेवाड, मळगाव, कोलगाव आणि दांडेली या ११ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. या सर्व ग्रामपंचायतींची मुदत १० फेब्रुवारी २०२६ रोजी संपली आहे.
आरक्षण सोडत काढण्यासाठी १२ जून २०२६ रोजी सकाळी ठीक ११ वाजता संबंधित सर्व ग्रामपंचायतींमध्ये विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात येणार आहे. तहसीलदार यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली ही सोडत जाहीर केली जाईल. यामध्ये अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST), नागरिकांचा मागासप्रवर्ग (OBC) आणि सर्वसाधारण प्रवर्ग यांसह या सर्व प्रवर्गांतील महिलांसाठीचे आरक्षण चिठ्ठी टाकून निश्चित केले जाणार आहे. या विशेष ग्रामसभेची नोटीस नागरिकांना ८ जून पर्यंत देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
राज्य निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या निवडणूक पूर्व आरक्षण कार्यक्रमानुसार, ८ जून रोजी आरक्षण सोडत काढण्याकरिता विशेष ग्रामसभेची सूचना दिली जाईल. त्यानंतर १२ जून रोजी प्राधिकृत अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली विशेष ग्रामसभा बोलावून आरक्षण सोडत काढण्यात येईल. १७ जून रोजी प्रभागनिहाय आरक्षण प्रारूप अधिसूचनेस जिल्हाधिकाऱ्यांची मान्यता घेतली जाईल आणि १९ जून रोजी प्रभागनिहाय आरक्षणाचे प्रारूप प्रसिद्ध केले जाईल. नागरिकांना आरक्षणाच्या निश्चितीबाबत हरकती व सूचना दाखल करण्यासाठी १९ जून ते २५ जून हा कालावधी देण्यात आला आहे.
प्राप्त हरकतींवर ३ जुलै २०२६ रोजी उपविभागीय अधिकारी (SDO) विचार करून आपला अभिप्राय देतील. या अभिप्रायानंतर ८ जुलै २०२६ रोजी अंतिम अधिसूचनेस जिल्हाधिकारी मान्यता देतील आणि १० जुलै २०२६ रोजी या अंतिम प्रभाग रचनेला व्यापक प्रसिद्धी दिली जाईल.
या संपूर्ण प्रक्रियेसाठी सावंतवाडीचे तहसीलदार श्रीधर पाटील यांनी पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना आवश्यक ते आदेश दिले आहेत. ११ ग्रामपंचायतींसाठी ११ अधिकारी आणि २ राखीव अधिकारी अशा एकूण १३ अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सावंतवाडी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी निलेश जाधव यांनीही सर्व संबंधित ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना निवडणूक नियमांचे पालन करत तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर झाल्यामुळे आता सावंतवाडी तालुक्यातील ग्रामीण भागात राजकीय हालचालींना वेग आला असून, आपले प्रभाग कोणत्या प्रवर्गासाठी आरक्षित होणार याकडे इच्छुकांचे लक्ष लागले आहे.