सावंतवाडी,दि.२ सप्टेंबर
शासनाकडून मंजूर झालेली आंबा व काजू पिकांची नुकसान भरपाई गणेश चतुर्थीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी, तसेच ई-पीक पाहणी नोंदणीचे काम पूर्वीप्रमाणेच तलाठी यांच्याकडे सोपवावे, या प्रमुख मागण्यांसाठी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने सावंतवाडीचे तहसीलदार श्रीधर पाटील यांची भेट घेऊन निवेदन दिले. तहसीलदारांनी या मागण्यांवर सकारात्मक चर्चा करत लवकरात लवकर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले आहे.
शासनाने आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाई मंजूर केली आहे. आगामी गणेशोत्सव विचारात घेता ही मदत सणापूर्वीच शेतकऱ्यांना मिळणे अत्यंत गरजेचे आहे, अशी ठाम भूमिका शिष्टमंडळाने मांडली.
तसेच, सध्या प्रशासनाकडून सुरू असलेल्या ई-पीक पाहणी नोंदणी प्रक्रियेवर शिष्टमंडळाने गंभीर प्रश्न उपस्थित केले. पीक पाहणी सहाय्यकांकडून ही नोंदणी वेळेत पूर्ण होत नाही व पुढेही ती वेळेत होणे अशक्य दिसत आहे. नोंदणीची मुदत संपल्यानंतर अनेक शेतकरी या प्रक्रियेपासून वंचित राहून त्यांचे मोठे आर्थिक नुकसान होण्याची भीती व्यक्त करण्यात आली. त्यामुळे ही प्रक्रिया पूर्ववत तलाठ्यांमार्फतच राबवण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
यावेळी शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये माजी जिल्हाप्रमुख अशोक दळवी, तालुकाप्रमुख नारायण राणे, उपतालुकाप्रमुख गजानन नाटेकर, व्ही. जे. एन. टी. अध्यक्ष आनंद वरक, मागासवर्गीय सेलचे अध्यक्ष राजेश जाधव, तालुका संघटक संजय गावडे, विभाग प्रमुख संजय माजगावकर, युवा तालुकाप्रमुख प्रशांत जाधव, सचिव विश्वास घाग, उपविभाग प्रमुख संदेश सोनुर्लेकर, ओबीसी उपतालुका प्रमुख लक्ष्मण भालेकर, सावंतवाडी उपतालुका प्रमुख राकेश पवार, माजी नगरसेविका स्वप्ना नाटेकर आणि एकनाथ गावडे आदींचा समावेश होता.