सावंतवाडी,दि.२३ जून
प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, कुलाबा, मुंबई यांच्या सांख्यिकीय हवामान अंदाज मॉडेलवर आधारित, ग्रामीण कृषी मौसम सेवा (उद्यानविद्या महाविद्यालय, मुळदे) आणि डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली यांच्या संयुक्त विद्यमाने पुढील ५ दिवसांचा (२४ ते २८ जून २०२६) जिल्हास्तरीय हवामान अंदाज जाहीर करण्यात आला आहे. यानुसार जिल्ह्यात पुढील पाच दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मंगळवारी सकाळी नोंद झालेल्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात सरासरी ८०.८७ मि.मी. पावसाची नोंद झाली असून तालुकानिहाय पाऊस (मि.मी. मध्ये) पुढीलप्रमाणे आहे:
देवगड: १२६ मि.मी.
कुडाळ: १०३ मि.मी.
वैभववाडी: ९७ मि.मी.
कणकवली: ९० मि.मी.
सावंतवाडी: ८७ मि.मी.
दोडामार्ग: ८० मि.मी.
मालवण: ३४ मि.मी.
वेंगुर्ला: ३० मि.मी. पाऊस झाला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार जिल्ह्यात पुढील ५ दिवस आकाश पूर्णपणे ढगाळ राहील. २५ जून रोजी जिल्ह्यात सर्वाधिक ५० मि.मी. पावसाची शक्यता असून, उर्वरित दिवसांत ३५ ते ४५ मि.मी. दरम्यान मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडेल. या काळात कमाल तापमान २७ ते २८ अंश सेल्सिअस तर किमान तापमान २४ ते २५ अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. हवेतील आद्रतेचे प्रमाण ९० टक्क्यांपेक्षा जास्त राहणार असून वाऱ्याचा वेग ताशी २ ते ९ किलोमीटर इतका राहील.
या कालावधीत मुसळधार पाऊस आणि ढगाळ वातावरण राहणार असल्याने शेतकऱ्यांनी शेतीची कामे करताना योग्य काळजी घ्यावी व हवामानाचा अंदाज घेऊनच नियोजन करावे, असे आवाहन कृषी विद्यापीठ आणि हवामान केंद्राकडून करण्यात आले आहे.