सावंतवाडी,दि.०२ ऑगस्ट
आसोली जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा, श्री नारायण विद्या मंदिर, आसोली नं. १ यांच्या वतीने शेतकरी बाळा तुळसकर यांच्या शेतामध्ये ‘बांधावरची शाळा’ हा उपक्रम उत्साहपूर्ण वातावरणात राबविण्यात आला.
या उपक्रमात विद्यार्थ्यांनी शेतात प्रत्यक्ष जाऊन भात लागवड, शेताची मशागत, पिकांची निगा, खतांचा योग्य वापर, पाण्याचे नियोजन तसेच शेतीतील विविध कामांची माहिती प्रत्यक्ष अनुभवातून घेतली. बाळा तुळसकर यांनी विद्यार्थ्यांना शेतीचे महत्त्व, शेतकऱ्यांचे कष्ट आणि आधुनिक शेती पद्धती याविषयी उपयुक्त मार्गदर्शन केले. त्यामुळे विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानाबरोबरच प्रत्यक्ष अनुभव शिक्षणाची मौल्यवान संधी मिळाली.
या उपक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व सदस्य तसेच पालकांनी मोलाचे सहकार्य केले. ग्रामपंचायत सदस्य राकेश धुरी यांनी विद्यार्थ्यांसाठी खाऊची व्यवस्था केली तसेच अरुण सांगळे यांनीही विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करून प्रोत्साहन दिले.
बाळा तुळसकर व त्यांच्या कुटुंबीयांनी सर्व विद्यार्थ्यांसाठी अल्पोपहाराची उत्तम व्यवस्था करून या शालेय उपक्रमात मोलाची भर घातली.
विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी आवड निर्माण करणे, शेतकऱ्यांच्या कष्टांविषयी आदराची भावना रुजविणे आणि अनुभवातून शिक्षण देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. उपस्थित पालक व ग्रामस्थांनी या अभिनव उपक्रमाचे मनापासून कौतुक करत अशा उपक्रमांचे नियमित आयोजन व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी मुख्याध्यापक वैभवी रायशिरोडकर व सहकारी शिक्षकांनी ग्रामस्थांच्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले.