​सावंतवाडी : वीज समस्येवर सब स्टेशन आणि सोलर एनर्जी हाच कायमस्वरूपी पर्याय: आमदार प्रमोद जठार

शेअर करा

माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या पुढाकाराने विशेष बैठकीचे आयोजन; अधिवेशनात प्रश्न मांडण्याचे आमदारांचे आश्वासन


​सावंतवाडी, दि. ५ जून
वीज समस्या सोडविण्यासाठी सकारात्मक प्रयत्न करताना सब स्टेशन वाढविणे आणि ‘सोलार एनर्जी’ (सौर ऊर्जा) हा पर्याय स्वीकारणे अत्यंत गरजेचे आहे, असे प्रतिपादन आमदार प्रमोद जठार यांनी केले. सावंतवाडी शहरात वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे नागरिक आणि व्यापाऱ्यांना सहन करावा लागणारा मनस्ताप पाहता, वीज वितरणच्या कारभारात सुलभता आणून कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी कळकळीची मागणी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, भाजप पदाधिकारी आणि नगरसेवकांनी आमदार जठार यांच्याकडे केली. या संदर्भातील मागण्यांचे निवेदनही त्यांना सादर करण्यात आले. आगामी अधिवेशनात या प्रश्नांना प्राधान्य देऊन निश्चितच मार्ग काढू, असे आश्वासन आमदारांनी यावेळी दिले.


​माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या पुढाकारातून शहरातील वीज समस्येबाबत येथील काझीशहाबुद्दीन सभागृहात एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत आमदार जठार बोलत होते. व्यासपीठावर उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजीत देसाई, माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, सामाजिक कार्यकर्ते डॉ. जयंत परुळेकर, आरोग्य सभापती सुधीर आडीवरेकर, उद्यान सभापती मोहिनी मडगावकर आणि बालकल्याण सभापती दिपाली भालेकर आदी उपस्थित होते.
​लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी मांडल्या तीव्र भावना


​बैठकीच्या सुरुवातीला बबन साळगावकर यांनी सावंतवाडीतील वीज समस्येची सद्यस्थिती आणि नागरिकांचे हाल मांडत लवकरात लवकर तोडगा काढण्याची मागणी केली. उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांनी आमदार जठार यांच्या ‘आमदार आपल्या दारी’ या उपक्रमाचे कौतुक केले. मात्र, शहरातील वीज समस्येवर आवाज उठवणाऱ्या पत्रकारांवर वीज कर्मचाऱ्यांकडून गुन्हे दाखल केले जात असल्याबद्दल त्यांनी तीव्र आक्षेप नोंदवला व यात लक्ष घालण्याची मागणी केली.


​सामाजिक कार्यकर्ते डॉ. जयंत परुळेकर यांनी संताप व्यक्त करत सांगितले की,
​”हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन सुरू असताना वीज कधी जाईल याचा भरवसा नसल्याने आम्हाला नेहमी जनरेटर सुरू ठेवावा लागतो. हजारो रुपयांचे बिल भरूनही वीज मिळत नाही आणि अधिकारी फोन स्विच ऑफ करून ठेवतात. विजेच्या लपंडावामुळे लोकांची महागडी उपकरणे निकामी होत आहेत.”


​आरोग्य सभापती सुधीर आडीवरेकर यांनी पालिकेच्या बैठकीलाही वीज अधिकारी सकारात्मक प्रतिसाद देत नसल्याचा आरोप केला. तर दिलीप भालेकर यांनी, एका भागात काम सुरू असताना दुसऱ्या भागाची वीज कोणतीही पूर्वकल्पना न देता खंडित केली जाते, ज्यामुळे लोकप्रतिनिधींना जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागते, असे सांगत या पद्धतीत सुधारणा करण्याची मागणी केली.


​कोकणात भूमिगत वाहिन्यांमुळे प्रश्न सुटणार: आमदार जठार
​सर्व तक्रारी ऐकल्यानंतर आमदार प्रमोद जठार यांनी उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांच्या माध्यमातून दर महिन्याला वीज वितरणचा पाठपुरावा करून समस्या सोडवल्या जातील, अशी ग्वाही दिली. ते म्हणाले की, २०१४ पर्यंत महाराष्ट्रात १४-१४ तास लोडशेडिंग होत होते, मात्र भाजपची सत्ता आल्यानंतर देश आणि राज्य वीज क्षेत्रात स्वयंपूर्ण झाले आहे. ‘वन नेशन, वन ग्रीड’ मुळे सर्व ग्रीड जोडले गेले आहेत. सध्याचे विजेचे प्रश्न प्रामुख्याने झाडे व फांद्या पडल्यामुळे होत आहेत.


​ते पुढे म्हणाले की, सागरी किनारपट्टीच्या भागातील वीज वाहिन्या भूमिगत (अंडरग्राउंड) करण्यासाठी केंद्र सरकारकडून निधी मिळाला असून त्याचे काम सुरू आहे. कोकणात हे काम पूर्ण झाल्यावर वीज खंडित होण्याचा प्रश्न कायमचा मिटेल. सरकार अपारंपरिक ऊर्जा आणि सोलरसह अनेक नवीन प्रयोग करत असून लोडशेडिंग राहणार नाही यासाठी कटिबद्ध आहे. सध्या आचारसंहिता असल्याने अधिकारी उपस्थित राहिले नाहीत, मात्र अधिवेशनात सर्व माहिती मांडून, अधिकाऱ्यांना सोबत घेऊन पुन्हा एकदा याच ठिकाणी जनतेसमोर येईन, असे आश्वासन त्यांनी दिले.


या बैठकीला नियोजन समितीचे सभापती आनंद नेवगी, पाणीपुरवठा सभापती प्रतीक बांदेकर, माजी नगरसेवक विलास जाधव, नगरसेविका नीलम नाईक, दुलारी रांगणेकर, सुकन्या टोपले, सुनिता पेडणेकर, ॲड. सिद्धार्थ भांबुरे, संदीप सावंत, राजू पनवेलकर, दादा मडकईकर, दिलीप भालेकर, संतोष गावस, दत्तप्रसाद गोटस्कर, डॉ. मधुकर घारपुरे, महेश खानोलकर, मनोज घाटकर यांच्यासह अनेक नागरिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेअर करा