सावंतवाडी, दि. ३ जून
सावंतवाडी शहरात आज बुधवारी पहाटेच्या सुमारास संशयास्पद रित्या एसी (AC) कॉम्प्रेसर घेऊन जाणाऱ्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ताब्यातील मालाबाबत समाधानकारक स्पष्टीकरण न देऊ शकल्याने या दोघांवरही सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज बुधवारी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास सावंतवाडी शहरातील ‘तीन मुशी’ परिसरात पोलीस हवालदार कोरगावकर आणि पोलीस हवालदार सुरेश पाटील हे नेहमीप्रमाणे रात्रीच्या गस्तीवर होते. यावेळी त्यांना एक वाहन संशयास्पद रित्या जाताना दिसले. पोलिसांनी वाहन थांबवून तपासणी केली असता, त्यामध्ये एक एसी कॉम्प्रेसर आढळून आला.
वाहनातील संशयित उमेश केशव नाईक (रा. माणगाव कालेली) व सोहम मुकुंद पिळणकर (रा. सालईवाडा, सावंतवाडी) यांच्याकडे पोलिसांनी या कॉम्प्रेसरबाबत सखोल चौकशी केली. मात्र, त्यांच्या ताब्यातील या मालाबाबत त्यांना पोलिसांना कोणतेही समाधानकारक स्पष्टीकरण किंवा वैध कागदपत्रे सादर करता आली नाहीत.
पहाटेच्या वेळी विनाकारण संशयास्पद रित्या हा माल घेऊन जात असल्यामुळे अखेर पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबतची माहिती सावंतवाडीचे पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी दिली. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस हवालदार सुरेश पाटील करीत आहेत.