सावंतवाडी : गोवा बनावटीच्या बेकायदेशीर बिअरची वाहतूक करणारी स्विफ्ट गाडी आंबोली चेकपोस्टवर पकडली…

शेअर करा

सव्वाचार लाखांचा मुद्देमाल जप्त

​सावंतवाडी, दि. २९ मे 
गोव्याहून पुण्याच्या दिशेने मारुती स्विफ्ट गाडीतून बेकायदेशीरपणे केली जाणारी गोवा बनावटीच्या बिअरची वाहतूक आंबोली पोलीस चेकपोस्टवर पकडण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका संशयिताविरुद्ध दारूबंदी कायद्याखाली गुन्हा दाखल केला असून, गाडीसह एकूण ४ लाख २१ हजार ३६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
​ज्ञानेश्वर मारुती चिंतोळे (रा. रांजणगाव, तालुका शिरूर, जि. पुणे; मूळ रा. लोह, जि. नांदेड) असे गुन्हा दाखल झालेल्या चालकाचे नाव आहे.
​पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी ज्ञानेश्वर चिंतोळे हा आपल्या ताब्यातील मारुती स्विफ्ट गाडी (क्रमांक MH 12 JC 5640) मधून गोव्याहून पुण्याच्या दिशेने जात होता. गुरुवारी (दि. २८ मे) रात्री उशिरा ही गाडी आंबोली चेकपोस्टवर आली असता, पोलिसांनी ती थांबवून तिची तपासणी केली. या तपासणीत गाडीमध्ये २१ हजार ३६० रुपये किमतीचे गोवा बनावटीच्या बिअरचे टीन बेकायदेशीरपणे वाहतूक करताना आढळून आले.
​आंबोली पोलिसांनी तात्काळ कारवाई करत २१ हजार ३६० रुपयांची बिअर आणि चार लाख रुपये किमतीची स्विफ्ट गाडी, असा एकूण ४ लाख २१ हजार ३६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
​सदरची यशस्वी कारवाई पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) सरदार पाटील, पोलीस हवालदार संतोष गलोले, मनीष शिंदे, रामदास जाधव, पोलीस अंमलदार काळे, परब आणि होमगार्ड जंगले व बरगडे यांच्या पथकाने केली. याप्रकरणी आंबोली पोलीस ठाण्यात पुढील तपास सुरू आहे.

शेअर करा