एरंडोकवाडी येथे महामार्गावर झाड आडवे पडल्याने काही काळ एकेरी वाहतूक; सुदैवाने जीवित व वित्तहानी टळली.
सावंतवाडी दि.२३ जून,
जुन्या मुंबई गोवा महामार्गावरील कोलगाव येथे शैलेश पई यार्ड समोर भर पावसात धोकादायक झाड उन्मळून पडून थेट महामार्गावर आले. ही घटना मंगळवारी संध्याकाळी चार वाजता घडली. या झाडांमुळे एकेरी मार्गाने वाहतूक सुरू होती. सुदैवाने हे झाड पडून कोणतीही जीवित अथवा वित्त हानी झाली नाही.
जुन्या मुंबई गोवा महामार्गावरील कोलगाव शैलेश पै यार्ड समोरील ठिकाणी दिवसभर सुरू असलेल्या पावसामुळे झाड उन्मळून पडले. हे झाड महामार्गावर मधोमध आडवे असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला त्यामुळे एकेरी मार्गाने वाहतूक सुरु होती. ही घटना मंगळवारी संध्याकाळी चार च्या दरम्यान घडली तर उशिरा पर्यंत झाड रस्त्यावर पडून होते.
जुन्या मुंबई गोवा महामार्गावरील कोलगाव तिठा ते पै यार्ड पर्यंतचा दिड किमीच्या पट्यावर धोकादायक झाडे आहेत. रस्त्याच्या दुतर्फा काही खाजगी जागेत ही झाडे असून दरवर्षी पावसाळ्यात ही झाडे उन्मळून पडतात त्यामुळे जीवित हानी होण्याची शक्यता आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि वनखाते यांना कोलगाव ग्रामपंचायतीने वारंवार पत्रे देऊन देखील ही झाडे तोडण्यात आलेली नाहीत. याबाबत विचारणा केली असता दोन्ही विभाग एकमेकांकडे बोट दाखवत आहेत. याच भागात पावसाळ्यात दरवर्षी झाडे उन्मळून पडतात त्यामुळे वाहनांना अडसर निर्माण होतो. ही कामे पाऊस सुरू होण्यापूर्वी होणे आवश्यक होते मात्र सबंधित विभागाच्या दुर्लक्ष कारणाने सातत्याने अशा घटना घडत आहेत.