सावंतवाडी,दि.१९ जून
येथील नगरपरिषद गार्डन जवळील पर्यटन केंद्रातील कॉम्प्रेसर चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी सावंतवाडी पोलिसांनी दोघा संशयितांना आज पहाटे अटक केली असून त्यांच्याकडून चोरीचा कॉम्प्रेसर आणि गुन्ह्यात वापरलेली हुंडाई वेरना कार जप्त करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नगरपरिषदेचे अधिकारी गोविंद अशोक गवंडे (वय ३८, रा. खास्कीलवाडा, सावंतवाडी) यांनी सावंतवाडी पोलीस ठाण्यात या चोरीबाबत रीतसर तक्रार दाखल केली होती. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी तपास चक्र वेगाने फिरवत आज पहाटे दोन संशयितांना ताब्यात घेतले.
उमेश केशव नाईक (वय ३१, रा. माणगाव, ता. कुडाळ) आणि सोहम मुकुंद पिळणकर (वय १९, रा. सालईवाडा, सावंतवाडी) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. अटक केल्यानंतर संशयितांना आज न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने त्यांना १५ दिवसांची मॅजिस्ट्रेट कस्टडी (न्यायालीन कोठडी) मंजूर केली. तदनंतर त्यांची जामिनावर मुक्तता करण्यात आली आहे.
पोलिसांनी संशयितांकडून चोरीला गेलेला एक कॉम्प्रेसर आणि चोरीच्या गुन्ह्यात वापरलेली हुंडाई वेरना कार (क्रमांक GA-08-F-9576) हस्तगत केली असून अधिक तपास पोलीस करत आहेत, असे पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी सांगितले.