​सावंतवाडी : ‘ओंकार’ हत्तीवर पेटती मशाल फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल; प्राणिप्रेमींचा संताप, उपवनसंरक्षकांकडून चौकशीचे आदेश

शेअर करा

सावंतवाडी,दि.०१ ऑक्टोंबर
सावंतवाडी तालुक्यातील बांदा पंचक्रोशीत भटकंती करणाऱ्या ‘ओंकार’ नावाच्या वन्य हत्तीवर धगधगती मशाल फेकल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने प्राणिप्रेमी आणि नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. या घटनेत हत्तीच्या डोक्याला दुखापत झाली असून, वनविभागाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. उपवनसंरक्षक मिलिश शर्मा यांनी सावंतवाडी वनक्षेत्रपालांना सखोल चौकशी करून तात्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
​गेल्या सात दिवसांपासून ओंकार हत्तीच्या डोक्यावर जखम दिसत असल्याने ही दुखापत मशाल अथवा सुतळी बॉम्बमुळेच झाली असावी, असा दावा केला जात आहे. शेतातून हत्तीला हुसकावून लावण्यासाठी हे कृत्य करण्यात आले असावे. तसेच व्हिडिओतील व्यक्तीचा गणवेश वन कर्मचाऱ्यासारखा दिसत असल्याने वनविभागाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
​‘ओंकार फाउंडेशन’चे अध्यक्ष गुणेश गवस यांनी वनविभाग हत्तीला मारण्याचा प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. हत्तीवर सुतळी बॉम्ब आणि मशाली फेकून त्याला जखमी केले जात असल्याचे पुरावे असल्याचा दावा त्यांनी केला. तर प्राणिप्रेमी तुषार देसाई यांनी, याआधीही सुतळी बॉम्ब फेकल्यानंतर वनविभागाने माफी मागितली होती, तरीही पुन्हा हा प्रकार घडल्याने दोषींवर कडक कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
​दरम्यान, या प्रकरणी उपवनसंरक्षक मिलिश शर्मा म्हणाले, “हत्तीवर मशाल फेकण्याचे कोणतेही आदेश वनविभागाने दिलेले नाहीत. व्हिडिओतील व्यक्ती वन कर्मचारी आहे की खाजगी, हे अजून स्पष्ट झालेले नाही. सावंतवाडी वनक्षेत्रपालांना या घटनेची चौकशी करून रिपोर्ट सादर करण्याचे आदेश दिले आहेत. अहवाल प्राप्त होताच दोषींवर नियमानुसार कडक कारवाई केली जाईल.”

शेअर करा