सातुळी बावळाट ग्रामस्थांचे बांधकाम विभागाला निवेदन
सावंतवाडी,दि.१२ ऑगस्ट
दाणोली-बांदा रस्त्यावरील गाव सातुळी बावळाट येथील रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेले खड्डे आणि चिखलामुळे वाहतूक धोकादायक बनली आहे. हे खड्डे तत्काळ न बुजवल्यास १५ ऑगस्ट पासून सार्वजनिक बांधकाम विभाग सावंतवाडी कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचा इशारा बावळाट येथील ग्रामस्थांनी दिला आहे. याबाबतचे निवेदन कार्यकारी अभियंत्यांना देण्यात आले आहे.
बावळाट गावातून जाणाऱ्या या रस्त्यावर गेल्या तीन महिन्यांपासून खोदकाम करून ठेवण्यात आले आहे. त्यामुळे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडून चिखल झाला आहे. या चिखलामुळे वाहने घसरून अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली असून प्रवाशांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. या संदर्भात ग्रामस्थांनी यापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन रस्ता दुरुस्तीची मागणी केली होती. मात्र, अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.
येत्या १५ ऑगस्टपूर्वी रस्त्यावरील खड्डे बुजवून रस्ता वाहतुकीस योग्य न केल्यास ग्रामस्थ उपोषणास बसणार आहेत. या कालावधीत कोणताही अपघात झाल्यास किंवा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची पूर्ण जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाची राहील, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. या निवेदनावर एकनाथ परब, महादेव बिरोडकर, भालचंद्र नाईक, टिळोजी परब, सुधीर गावकर, नितीन मल्हार, सखाराम सावंत यांच्यासह २४ ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्याचे निवेदन बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता पुजा इंगवले यांना देण्यात आले आहे.